नागोठणे । नितीन गायकवाड
आर्थिक अडचणींमुळे स्वतःच्याच घरातील आई आणि पत्नीचे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लपवून घरफोडीचा खोटा बनाव रचणाऱ्या फिर्यादीचा पोलिसी खाक्या दाखवताच पर्दाफाश झाला आहे. नागोठणे पोलीस आणि रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) संयुक्त पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत या बनावट घरफोडीचा छडा लावून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. दिपक रामचंद्र भुरे (रा. आंबेराई, पो. बेणसे, ता. पेण, जि. रायगड) असे घरफोडीचा बनाव रचणाऱ्या फिर्यादीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपक भुरे याने ५ सप्टेंबर २०२६ रोजी नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ४ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवासाठी आईसोबत बाहेर गेलो असता, अज्ञात चोरट्याने घराच्या बाथरूमची खिडकी व पोटमाळ्याचे लाकडी तावदान तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील तब्बल २२ तोळे सोन्याचे दागिने लांबवले, अशी खोटी कथा त्याने पोलिसांना सांगितली होती. या तक्रारीवरून नागोठणे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा (गु.र.नं. १८४/२०२६ BNS ३०५(अ), ३३१(४), ३३१(३)) दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास सहायक फौजदार संदेश सानप करत होते. तपासादरम्यान घटनेतील गांभीर्य लक्षात घेऊन एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील, नागोठणे पोलीस आणि एलसीबीच्या संयुक्त पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण सुरू केले. पोलिसांना घटनास्थळाच्या स्वरूपावरून व संशयित हालचालींवरून संशय आला. गोपनीय माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी फिर्यादी दिपक भुरे याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने स्वतःच हा बनाव रचल्याचे कबूल केले. आर्थिक अडचणींमुळे त्याने आई व पत्नीचे सोन्याचे दागिने स्वतःच लपवून ठेवले होते आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घरफोडीची खोटी तक्रार दिली होती. पोलिसांनी फिर्यादीच्या ताब्यातून १ लाख ८० हजार रुपयांची १२ तोळ्यांची सोन्याची गंथन, ३० हजार रुपयांचा २ तोळ्यांचा सोन्याचा सर, ३० हजार रुपयांची २ तोळ्यांची सोन्याची साखळी, २ लाख १० हजार रुपयांची ३ तोळ्यांची सोन्याची साखळी आणि २ लाख १० हजार रुपयांचा ३ तोळ्यांचा सोन्याचा हार असा एकूण ६ लाख ६० हजार रुपये किमतीचा २२ तोळे सोन्याचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (रोहा) प्रसाद गोकुळे आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोसई सूरज पाटील, पोहवा विनोद पाटील, शाम कराडे, नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विक्रांत बांधनकर व बळी पुटेवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
दरम्यान, प्रवासाला बाहेर पडताना घरात मोठे दागदागिने किंवा रोख रक्कम न ठेवता मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात, बाहेरगावी जाताना विश्वासातील शेजाऱ्यांना कल्पना द्यावी, परिसराच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून रात्री गॅलरी व मुख्य दाराजवळ पुरेसा प्रकाश ठेवावा, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी किंवा पोलीस हेल्पलाइन ११२ वर संपर्क साधावा, तसेच घरकामासाठी नोकर, ड्रायव्हर किंवा भाडेकरू ठेवण्यापूर्वी त्यांची पोलीस पडताळणी (Verification) करून घ्यावी, असे आवाहन रायगड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
