नागोठणे पोलीस ठाणे अन् एलसीबीची धडाकेबाज कारवाई
२ लाख ९९ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त; पोलादपूरच्या आरोपीला २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
नागोठणे । नितीन गायकवाड
नागोठणे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना तसेच लॉज चालकाला बनावट चेक देऊन लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या अट्टल भामट्याला नागोठणे पोलीस आणि रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) संयुक्त कारवाई करत गजाआड केले आहे. आरोपीकडून फसवणूक करून लांबवलेले तब्बल २ लाख ९९ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
विवेक अनंत हातकमकर (वय ३१, रा. काटेतळी, पो. सडवली, ता. पोलादपूर, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नेमकी घटना काय? पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आरोपी विवेक हातकमकर याने नागोठणे बाजारपेठेतील ‘परमार ज्वेलर्स’चे मालक हर्ष संदेश परमार (वय २७) यांचा विश्वास संपादन केला. आरोपीने दुकानातून सोन्याची साखळी, अंगठी, पेंडंट, कानातले व चांदीची साखळी असे एकूण २,९९,५०० रुपयांचे दागिने खरेदी केले. या दागिन्यांच्या मोबदल्यात आरोपीने बँक ऑफ इंडिया (पोलादपूर शाखा) आणि इंडसइंड बँक (चिंचवड, पुणे शाखा) यांचे चेक दिले. मात्र, खात्यात पुरेसे पैसे नसतानाही आरोपीने जाणीवपूर्वक हे चेक दिले होते, जे बँकेत वटले नाहीत.
केवळ ज्वेलर्सच नव्हे, तर आरोपीने साक्षीदार विपुल हेंडे यांची ८० हजार रुपयांची, चेतन कामथे यांच्याकडून कपडे घेऊन पैसे न देता, तसेच नागोठणे येथील ‘आनंद लॉज’मध्ये राहून लॉजचे १२ हजार रुपयांचे भाडे न देता फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुन्हा दाखल अन् तत्काळ अटक
याप्रकरणी सराफा व्यावसायिक हर्ष परमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून नागोठणे पोलीस ठाण्यात १५ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला (गुन्हा रजि. नं. १९१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१८(२)). गुन्हा दाखल होताच नागोठणे पोलीस व एलसीबीच्या पथकाने तत्काळ चक्रे हलवून १५ सप्टेंबर रोजी रात्री ११.०४ वाजता आरोपी विवेक हातकमकर याला अटक केली.
आरोपीला रोहा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २० सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, पोलीस कोठडीदरम्यान आरोपीकडून गुन्ह्यातील फसवणूक झालेला सर्व मुद्देमाल (२,९९,५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने) हस्तगत करण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट कामगिरी व पोलिसांचे आवाहन
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (रोहा) प्रसाद गोकुळे आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे, पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील, राजहंस नागदिवे तसेच पोलीस हवालदार विनोद पाटील, शाम कराडे, चंद्रशेखर नागावकर व राजेंद्र भोनकर यांच्या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे.
नागरिकांना आवाहन
“आरोपी विवेक हातकमकर याने अशाच प्रकारे अन्य कुठे किंवा आपल्या गावात फसवणूक अथवा अपहार केला असल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा नागोठणे पोलीस ठाण्याच्या ७७२१९७१००७ अथवा ९७६४०४१७८६ या क्रमांकावर संपर्क साधावा,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
