कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
महाड । मिलिंद माने
महाड औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा पुन्हा एकदा वाऱ्यावर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. येथील नामांकित ‘पिडिलाईट’ कंपनीत काम करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुण इलेक्ट्रिशियनचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
आलम हरून खान (वय २५) असे मृत कामगाराचे नाव आहे. आलम हा मूळचा बिहार राज्यातील जोगिया नगर (जि. पश्चिम चंपारण) येथील रहिवासी असून, सध्या कामासाठी महाडमधील बिरवाडी येथील आदर्श नगर परिसरात राहत होता. तो पिडिलाईट कंपनीत इलेक्ट्रिशियन म्हणून कार्यरत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडिलाईट कंपनीत इलेक्ट्रिकल काम करत असताना आलम याला विजेचा जोरदार धक्का लागला. हा धक्का इतका भीषण होता की, त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला तातडीने उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला ‘मृत’ घोषित केले.
सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
महाड औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक व इतर कंपन्यांमध्ये किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याचे सत्र सुरूच आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे कामगारांच्या जीविताची सुरक्षा धोक्यात आली आहे. “कंपन्यांमध्ये सुरक्षेच्या नियमांचे पालन होते का? औद्योगिक सुरक्षा विभाग (DISH) नेमकी कोणती तपासणी करते?” असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
या अपघाताची नोंद करण्यात आली असून, महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
