• Fri. Jul 31st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भिवंडीत चार मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; एकाचा मृत्यू, ५ ते ६ जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

ByEditor

Jul 31, 2026

भिवंडी: भिवंडीमध्ये गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एका चार मजली इमारतीचा भाग पत्त्यांसारखा कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ५ ते ६ नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ (NDRF) आणि पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.

एका जखमी महिलेची सुटका

एनडीआरएफच्या पथकाने ढिगाऱ्याखालून एका महिलेला सुखरूप बाहेर काढले आहे. या दुर्घटनेत ती महिला जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटना घडल्यापासून ढिगारा हटवण्याचे काम सातत्याने सुरू आहे. मात्र, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्यामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी आपत्कालीन यंत्रणांना सुरुवातीला असलेली एक चाळ जेसीबीच्या साहाय्याने तोडावी लागली.

नेमकी घटना कशी घडली?

  • कमकुवत बांधकाम: ‘कोहिनूर अपार्टमेंट’ नावाची ही इमारत २०१२ मध्ये बांधण्यात आली होती. मात्र, बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने ही इमारत आधीच धोकादायक जाहीर करण्यात आली होती.
  • दुरुस्तीदरम्यान तडे: गुरुवारी इमारतीच्या एका विंगमधील तळमजल्यावरील पिलर खराब झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. हे काम सुरू असतानाच इमारतीला अचानक तडे जाण्यास सुरुवात झाली.
  • वेळेवर खाली केली इमारत: रात्री ८ वाजेच्या सुमारास इमारत एका बाजूला झुकू लागली. ही गंभीर बाब लक्षात येताच महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने तातडीने वीज व पाणी कनेक्शन तोडले आणि पोलिसांच्या मदतीने इमारत पूर्णपणे रिकामी करून घेतली.

साहित्य घेण्यासाठी आत गेले अन् दुर्घटना घडली

प्रशासनाने इमारत वेळेत रिकामी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. परंतु, रात्री साडेअकराच्या सुमारास काही नागरिक आपले राहून गेलेले साहित्य आणण्यासाठी पुन्हा इमारतीत शिरले. दुर्दैवाने, त्याच क्षणी इमारत पूर्णपणे कोसळली. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ५ ते ६ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!