द्रोणागिरी सेक्टर-५० मधील घटना : उरण पोलीस ठाण्यात १५ जणांच्या जमावावर गुन्हा दाखल
उरण । घन:श्याम कडू
द्रोणागिरी सेक्टर-५० मधील निर्मल हाईट्स परिसरात रात्री कुटुंबासोबत फेरफटका मारणाऱ्या एका कुटुंबावर १० ते १५ जणांच्या जमावाने घातक हत्यारांसह प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगावर खरकटे पाणी टाकल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला. या घटनेत सात वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या आईच्या दिशेने कुऱ्हाड फेकण्यात आली असून सुदैवाने त्या बालंबाल बचावल्या. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरकटे पाणी फेकल्याने वादाची ठिणगी
मिळालेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास जसखार येथील रहिवासी रूपेश विनोद भोईर (३८) हे पत्नी रविना व सात वर्षांची मुलगी रूही यांच्यासह स्कूटरवरून फेरफटका मारत होते. निर्मल हाईट्सजवळ एका झोपडीतून त्यांच्यावर जेवणाचे खरकटे पाणी फेकण्यात आले. रूपेश भोईर यांनी याचा जाब विचारला असता संबंधित व्यक्तीने अरेरावी करत १० ते १५ जणांच्या जमावाला बोलावले.
घातक हत्यारांसह प्राणघातक हल्ला
हातात लोखंडी रॉड, कोयता, कुऱ्हाड आणि हातोडे घेऊन आलेल्या जमावाने भोईर कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत हल्ला चढवला. रूपेश भोईर यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या पत्नी आणि सात वर्षांच्या चिमुकलीच्या दिशेने हल्लेखोरांनी कुऱ्हाड फेकून मारली; मात्र वार चुकल्याने मोठा अनर्थ टळला. एका स्थानिक महिलेने प्रसंगावधान राखून चिमुकलीला सुरक्षितपणे जवळील सलूनमध्ये नेले.
लुटमार अन् वाहनाची तोडफोड
हल्लेखोरांनी भोईर यांच्या स्कूटरची तोडफोड केली. या धुमश्चक्रीत तक्रारदाराच्या पत्नीच्या गळ्यातील १ ते दीड तोळ्याची सोन्याची साखळी, रोख रक्कम आणि मोबाईल गहाळ झाला आहे. घटनास्थळी आलेल्या नागरिकांनी गुड्डू सिंग, बंटी सिंग आणि संदिप सिंग अशी काही हल्लेखोरांची नावे पोलिसांना सांगितली.

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
या प्रकरणी रूपेश भोईर यांच्या तक्रारीवरून उरण पोलिसांनी एफआयआर क्रमांक ०३२४/२०२६ नोंदवला आहे. संशयितांवर भारतीय न्याय संहितेतील कलम १८९(२), १८९(३), १८९(५), १९१(२), १९०, १०९(१) आणि ३२४(४) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश विठ्ठल कोंडालकर करत आहेत.
चिमुकलीवर कुऱ्हाड फेकण्याच्या या गंभीर घटनेमुळे द्रोणागिरी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
