• Thu. Sep 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘सोनियाच्या पावलांनी गौराई आली’ गाण्याचे चित्रीकरण संपन्न; गौरी-गणपती उत्सवात रसिकांच्या भेटीला

ByEditor

Sep 9, 2026

अदिती पाटील मुख्य भूमिकेत; पेणमधील ‘शिव-शंभो’ बंगल्यात पार पडले चित्रीकरण

पेण : विनायक पाटील
गौरी-गणपतीच्या उत्सवाचे औचित्य साधून निर्माते लाभेश पाटील यांच्या कल्पक संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘सोनियाच्या पावलांनी गौराई आली’ या नव्याकोर्या मराठी अल्बम साँगचे चित्रीकरण नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. पेण येथील म्हाडा कॉलनीतील ‘शिव-शंभो’ बंगल्यात या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले असून, हा गाण्यांचा नजराणा लवकरच गणेशोत्सवाच्या काळात रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठमोळी संस्कृती, परंपरा आणि गौरीच्या आगमनाचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या या सुमधुर गीताला गायिका सौ. वर्षा लाभेश पाटील यांचा आवाज लाभला आहे. या गीताचे लेखन निखिल भोईर (धोंडपाडा, पेण) यांनी केले असून, त्याला सुनील म्हात्रे (पेण) यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच गायिका चित्रा चोगले यांनी कोरससाठी विशेष साथ दिली आहे.

गाण्यातील नृत्यरचना प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मयुरेश पाटील (रामराज, अलिबाग) यांनी केली असून, छायांकनाची (Cinematography) जबाबदारी आकाश मोकल (कळवे, पेण) आणि निलेश पाटील (पेण) यांनी समर्थपणे सांभाळली आहे. आकर्षक नृत्यरचना, सुरेख चित्रीकरण आणि पारंपरिक वातावरणाचा मेळ यामुळे हे गीत प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरेल.

स्थानिक कलाकारांची मोठी फळी

या अल्बममध्ये अभिनेत्री अदिती (ॲश) पाटील मुख्य भूमिकेत चमकणार आहे. तिच्यासोबत कु. ओवी कैलास घरत, तन्वी पाटील, मनस्वी जाधव, प्रगती जाधव, सुजाता पवार, प्रियांका पवार, सायली म्हात्रे, रोशनी पाटील, मृण्मयी पाटील, रिया पाटील, अन्वी माळी आणि आरोही पाटील या सहकलाकारांनी नृत्यात सहभाग नोंदवला आहे.

चित्रीकरणादरम्यान श्री. व सौ. मेघा उपेंद्र पाटील (उलवे) आणि सौ. मयुरी कैलास घरत (खारपाडा) यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनेक दिग्गजांचे विशेष सहकार्य

हा अल्बम साकारण्यासाठी सुनील पाटील (साज मराठी), पत्रकार कैलासराजे घरत, मूर्तिकार निलेश दीपक समेळ, प्रशांत पोतदार, प्रांजली पोतदार (पेण), अमित माळी (उरण) आणि ‘शिव-शंभो’ बंगल्याचे मालक गणेश गायकर यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची माहिती निर्मात्यांनी दिली.

गौरीच्या आगमनाचा उत्साह, कौटुंबिक भावविश्व आणि लोकसंस्कृतीचा मिलाफ या गाण्यात पाहायला मिळणार असून, यंदाच्या गौरी-गणपती उत्सवात हे गीत रसिकांच्या मनात घर करेल, असा विश्वास निर्मिती संस्थेने व्यक्त केला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!