पहाटेच्या छाप्यात ३२ जण ताब्यात, ९ वाहने २९ मोबाईलसह ७५.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त
माणगाव । सलीम शेख
माणगाव शहरातील मुंबई-गोवा महामार्गा लगत कार्तिक हॉटेल समोरील एका इमारतीत सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर माणगाव पोलिसांनी गुरुवारी (दि. १०) पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली. पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आलेल्या या कारवाईत ३२ जणांवर कारवाई करण्यात आली. घटनास्थळा वरून ऑडी कार, दोन अर्टिगा, दोन मोटार सायकली, चार स्कुटी अशी एकूण नऊ वाहने तसेच २९ मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची प्राथमिक किंमत सुमारे ७५ लाख ८२ हजार २५ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे जुगार माफीयांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार माणगाव शहरातील मुंबई-गोवा महामार्गा वरील कार्तिक हॉटेल समोरील नारायण शेठ यांच्या मालकीच्या इमारती मध्ये जुगाराचा प्रकार सुरू असल्याची माहिती माणगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाईचे नियोजन केले. गुरुवारी पहाटे सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. समोरील बाजूने खोलीला कुलूप असल्याचे निदर्शनास आले. मात्र, पोलिसांनी मागील बाजूने अचानक प्रवेश केल्याने आत असलेल्या व्यक्तींमध्ये मोठी धावपळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेत ३२ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये हितेन छेडा हा मुख्य आरोपी असल्याची प्राथमिक माहिती असून, जुगारा साठी वापरल्या जात असल्याचा संशय असलेले २९ मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केले आहेत. याशिवाय घटना स्थळी आढळलेल्या नऊ वाहना मध्ये एक ऑडी, दोन अर्टिगा, दोन मोटारसायकली आणि चार स्कुटींचा समावेश आहे.
जप्त केलेल्या वाहनांसह इतर मुद्देमालाची एकूण किंमत ७५,८२,०२५ रुपये असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या या कथित जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाई मुळे अवैध धंदे करणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शना खाली माणगाव पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास माणगाव पोलीस करीत असून, या जुगाराच्या प्रकारा मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माणगाव शहर व परिसरात अवैध धंद्याविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शहरातील अवैध जुगार, मटका व इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अशाच प्रकारची कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
