प्रशासनाच्या कारभाराविरोधात स्थानिकांचा तीव्र संताप; तातडीने संरक्षक भिंत उभारण्याची मागणी
श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन शहरातील धोंडगल्ली परिसरात गुरुवारी दुपारी मुसळधार पावसामुळे डोंगरावरून एक भला मोठा दगड थेट वस्तीत कोसळल्याने प्रचंड खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दगडाखाली सापडलेल्या एका मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला. ऐन मोक्याच्या ठिकाणी हा दगड कोसळल्याने मोठा अनर्थ टळला असून, या घटनेनंतर प्रशासकीय दुर्लक्षामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील माती वाहून गेल्याने डोंगरउतारावरील एक प्रचंड दगड सैल झाला होता. गुरुवारी दुपारच्या सुमारास हा दगड अचानक घसरत खाली घरांच्या अत्यंत जवळ कोसळला. ज्या ठिकाणी दगड कोसळला, तेथे घरे अगदी खेटून आहेत. काही क्षण उशीर झाला असता तर मोठी जीवितहानी घडली असती. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
धोंडगल्ली परिसरामध्ये दरवर्षी पावसाळ्यात माती वाहून जाणे, दगड सैल होणे आणि दरडी कोसळण्याचा धोका कायम असतो. स्थानिकांनी डोंगराच्या पायथ्याशी मजबूत ‘संरक्षक भिंत’ उभारण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा केला होता. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक क्षेत्र म्हणून नागरिकांना घरे रिकामी करण्याची पत्रे दिली जातात; परंतु प्रत्यक्ष सुरक्षेसाठी आवश्यक असणारी कामे, डोंगर स्थिरीकरण किंवा आपत्ती प्रतिबंधक उपाययोजना करण्याकडे मात्र सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
“लोकांनी घरे सोडावीत अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जाते, पण त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक कामे मात्र केली जात नाहीत. प्रशासन नेमकं कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कायमस्वरूपी उपायांची मागणी
धोंडगल्लीतील आजची घटना हा भविष्यातील संभाव्य मोठ्या दुर्घटनेचा इशारा मानला जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ या भागाची पाहणी करून उर्वरित धोकादायक दगड हटवावेत, डोंगराच्या पायथ्याशी कायमस्वरूपी संरक्षक भिंत उभारावी आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने कृती आराखडा जाहीर करावा, अशी जोरदार मागणी धोंडगल्लीवासीयांकडून होत आहे.
