दिघी । गणेश प्रभाळे
श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली असून, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात केला आहे. याबाबती खा. सुनील तटकरे काय भूमिका घेणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.
दर्शन विचारे यांनी राष्ट्रवादी चे खासदार व प्रदेशाध्यक्ष यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, सन 2011 पासून त्यांनी तालुका अध्यक्ष म्हणून पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम केले. विविध निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका बळकट करण्यासाठी प्रयत्न केले असून, विचारधारा तळागाळात पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्य केले. मात्र, अलीकडील नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर पक्षातील काही निर्णय प्रक्रियेत स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची भावना निर्माण झाली.
पत्रात पुढे त्यांनी म्हटले आहे की, काही कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यानंतरही त्यांना महत्व दिले जात आहे, तर निष्ठेने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दुय्यम स्थान दिले जात आहे. यामुळे संघटनात्मक एकात्मतेला धक्का बसत असून, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अपेक्षित पाठबळ मिळाले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. “पक्षाची धुरा सांभाळताना प्रामाणिकपणे काम केले, मात्र माझ्या विचारांना व कामाला योग्य न्याय मिळाला नाही,” असेही त्यांनी नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर, आपणास दिलेल्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती करत त्यांनी तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला आहे. दरम्यान, या राजीनाम्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उघड झाले असून, आगामी स्थानिक राजकारणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
