म्हसळा तालुक्यातील घटना; बस ३-४ फूट खाली घसरली, सुदैवाने जीवितहानी टळली
श्रीवर्धन | अनिकेत मोहित
म्हसळा तालुक्यातील खालची आडी परिसरात आज पहाटेच्या सुमारास एक मोठा अनर्थ थोडक्यात टळला. समोरून अतिवेगाने येणाऱ्या ‘ट्रिपल सीट’ दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याखाली ३ ते ४ फूट खाली घसरली. एसटी चालकाने दाखवलेल्या अद्वितीय प्रसंगावधान आणि समयसूचकतेमुळे तिघांचे प्राण वाचले असून भीषण दुर्घटना टळली आहे. सुदैवाने बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

क्षणात घेतला डावीकडे बस दाबण्याचा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, खालची आडी येथून सकाळी ६ वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस नेहमीप्रमाणे मार्गस्थ झाली होती. मधल्या आडी परिसरात पोहोचताच समोरून तीन जणांना घेऊन अतिवेगाने येणारी एक दुचाकी चालकाच्या निदर्शनास आली. दुचाकीचा वेग प्रचंड असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटण्याची स्थिती निर्माण झाली होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखत एसटी चालकाने थेट होणारी धडक टाळण्यासाठी बस डावीकडे घेत नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्ता अत्यंत अरुंद असल्याने बसचे डाव्या बाजूचे दोन्ही टायर रस्त्याखाली घसरले आणि बस ३ ते ४ फूट खाली उतरली. चालकाच्या या चपळ निर्णयामुळे दुचाकीस्वारांचे प्राण वाचले तसेच बसचेही कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.
जि. प. सदस्य अभिषेक विचारे यांच्याकडून तातडीची मदत
घटनेची माहिती मिळताच म्हसळा तालुक्याचे जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चालक व वाहकाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. रस्त्याखाली अडकलेली बस बाहेर काढण्यासाठी क्रेनची आवश्यकता होती. एसटी कर्मचाऱ्यांची अडचण ओळखून विचारे यांनी स्वतः पुढाकार घेत क्रेनच्या खर्चासाठी आर्थिक मदत केली. त्यांच्या या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.
निष्काळजी वाहनचालकांबाबत संताप
स्थानिक नागरिकांनी एसटी चालकाच्या कौशल्याचे व समयसूचकतेचे कौतुक केले आहे. या घटनेने एकीकडे एसटी चालकांचे दायित्व आणि कौशल्य अधोरेखित केले असले, तरी दुसरीकडे सार्वजनिक रस्त्यावर ‘ट्रिपल सीट’ आणि अनिर्बंध वेगाने वाहने चालवणाऱ्या बेजबाबदार चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
