• Sat. Aug 1st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रात्रगस्तीदरम्यान वन विभागाची धडक कारवाई: खैर लाकडाची अवैध वाहतूक उधळली!

ByEditor

Aug 1, 2026

४ आरोपी अटकेत; दोन दुचाकींसह ₹८४ हजार २८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त

माणगाव | सलीम शेख
माणगाव तालुक्यातील कशेणे राखीव वन क्षेत्रात खैर वृक्षाच्या सोलीव लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध वन विभागाने धडक कारवाई करत चार जणांना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत खैर लाकडाचा साठा तसेच दोन दुचाकी असा एकूण ८४ हजार २८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर भारतीय वन अधिनियम, १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपवनसंरक्षक रोहा, सहाय्यक वनसंरक्षक रोहा आणि माणगावचे वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुजित राजमाने, वनरक्षक अमिना मणेर (कुशेडे), वैशाली भोर (रातवड), अशोक कोहकडे (इंदापूर) आणि निलेश नाईकवाडे (माकटी) यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोहीम राबवली. पथकाने मौजे कशेणे येथील राखीव वन क्रमांक ३०६ (पार्ट) परिसरात रात्रीची गस्त घातली असता, जंगलातून दोन दुचाकींवर खैर लाकडाचे सोलीव तुकडे भरलेल्या गोण्या घेऊन चार जण जात असल्याचे निदर्शनास आले. वन कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाठलाग करून कशेणे ते मुगवली दरम्यान कालव्याजवळ तस्करांना ताब्यात घेतले.

या कारवाईत २४ हजार २८६ रुपये किमतीचे १.७५९ घनमीटर खैर सोलीव तुकडे आणि ६० हजार रुपये किमतीच्या MH 06 CR 5485 व MH 06 BZ 4507 या क्रमांकांच्या दोन दुचाकी असा एकूण ८४ हजार २८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नितीन रविंद्र वाघमारे (वय १८), रोशन संतोष जाधव (वय २०), सहादेव तुकाराम जाधव (वय ३०) आणि महेश संतोष जाधव (वय २३, सर्व रा. नगरोली) या चार आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध इंदापूर परिमंडळात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींना माणगावच्या प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ जुलैपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वनपाल सुजित राजमाने करीत असून वनसंपत्तीची अवैध तोड व वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वन विभागाने दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!