• Mon. Jul 6th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जेएनपीए बंदरात कंटेनर कोसळून १९ वर्षीय कामगाराचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी

ByEditor

Jul 6, 2026

​वादळी वाऱ्यामुळे दुर्घटना; अधिकृत यंत्रणांच्या ‘मौन’मुळे माहिती दडविल्याची चर्चा

घनःश्याम कडू
​उरण : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर शनिवारी मध्यरात्री उरण तालुक्यात वादळी वाऱ्याने जोरदार धुमाकूळ घातला. या वादळी वाऱ्याचा फटका जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणातील (JNPA) एनएसएफटी (NSFT) टर्मिनलला बसला असून, येथे रचून ठेवलेले रिकामे कंटेनर अचानक कोसळून एका १९ वर्षीय तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. अमितकुमार किशोर प्रसाद (वय १९, रा. बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. दरम्यान, या गंभीर दुर्घटनेबाबत अधिकृत यंत्रणांनी मौन बाळगल्याने माहिती दडवली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री टर्मिनलमध्ये नियमित काम सुरू असताना अचानक आलेल्या तीव्र वादळाने उभे असलेले काही रिकामे कंटेनर असंतुलित झाले आणि ते थेट खाली काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर कोसळले. हा अपघात इतका अचानक आणि भीषण होता की कामगारांना स्वतःचा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. इतर कामगारांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले, तर मृत अमितकुमारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

​प्रशासनाचे मौन आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

एवढी मोठी जीवितहानी होऊनही जेएनपीए प्रशासन अथवा संबंधित शासकीय यंत्रणांकडून कोणतीही अधिकृत माहिती किंवा पत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. प्रशासनाच्या या गुप्ततेमुळे कामगार वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हवामान खात्याने वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तवला असतानाही रात्रीच्या वेळी काम का सुरू ठेवण्यात आले? कंटेनरची सुरक्षित रेषेत रचना (Staking) केली गेली होती का? आणि कामगारांच्या सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का? असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

​घटनास्थळावरील काही प्रत्यक्षदर्शी कामगारांनी कंटेनर कोसळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, बंदरातील सुरक्षेच्या त्रुटींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. अधिकृत तपास अहवाल समोर आल्यानंतरच या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!