• Sat. Jul 4th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा; चिरनेर-नागावमध्ये पूरपरिस्थिती, रहिवाशांच्या घरात शिरले पाणी!

ByEditor

Jul 4, 2026

आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी मुख्यालयातून बेपत्ता; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप; नुकसान भरपाईची मागणी

अनंत नारंगीकर
उरण :
शनिवारी सकाळपासून उरण शहर आणि तालुक्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे. तालुक्यातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले असून, चिरनेर गावामध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. चिरनेर, नागाव यांसह तालुक्यातील इतरही अनेक गावांतील रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू आणि फर्निचरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या ऐन संकटकाळात आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी मुख्यालयात हजर नसल्याने पूरग्रस्तांमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

उरण तालुक्यात दरवर्षी मुसळधार पाऊस पडत असतानाही, येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यास राहत नसल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. शनिवारी अचानक आलेल्या पुरामुळे नागरिक हवालदिल झाले होते, मात्र शासकीय मदत यंत्रणा वेळेवर पोहोचू शकली नाही. अखेर, गावागावांतील पूरग्रस्त रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम स्थानिक तरुणांनी आणि नागरिकांनीच एकमेकांच्या मदतीने केले. तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या असल्या, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरवर्षी पावसाळ्यात चिरनेर आणि परिसराला पुराचा वेढा पडत असल्याने, संतप्त ग्रामस्थ आता स्थानिक लोकप्रतिनिधी, विकासक आणि शासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत. या पुरामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी शासनाने तातडीने या भागाचे पंचनामे करून पूरग्रस्तांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, तसेच भविष्यात रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरणार नाही यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी उरणमधील नागरिकांकडून केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!