• Tue. Aug 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रात्रीच्या वेळी वाईन शॉपचे शटर तोडून चोरी करणारा सराईत चोरटा एलसीबीच्या जाळ्यात; दोन गुन्हे उघडकीस

ByEditor

Aug 18, 2026

रसायनी: रात्रीच्या सुमारास वाईन शॉपचे शटर तोडून मोबाईल व रोख रकमेची चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे रसायनी आणि अलिबाग पोलीस ठाण्यातील घरफोडीचे दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

रामनिवास मंजु गुप्ता (वय ३८, रा. रौनक सिटी, आधारवाडी, कल्याण पश्चिम, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी रसायनी येथील डिंपल वाईन शॉपचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने १ सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि ५५ हजार रुपयांची रोख रक्कम लांबवली होती. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात बीएनएस कायदा कलम ३०५ व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासासाठी विशेष पथक तैनात केले. पथकाने रसायनीसह आसपासच्या परिसरातील आणि लगतच्या जिल्ह्यांतील सीसीटीव्ही फुटेजची सखोल पाहणी केली. दरम्यान, सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी कर्जत येथे पुन्हा घरफोडीच्या उद्देशाने येणार असल्याची पक्की बातमी एलसीबीचे पोलीस हवालदार प्रतीक सावंत यांना मिळाली. या माहितीच्या आधारे तपास पथकाने कर्जत परिसरात सापळा रचून आरोपी रामनिवास गुप्ता याला शिताफीने ताब्यात घेतले.

पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने रसायनी (गु.र.क्र. १३४/२०२६) तसेच अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (गु.र.क्र. २५२/२०२५) घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सदर यशस्वी कारवाई रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक फौजदार संदीप पाटील, पोलीस हवालदार सुधीर मोरे, रवी मुंडे, प्रतीक सावंत, शरद फरांदे, रणजितसिंह खराडे, मनोहर सिरतार, पोलीस शिपाई प्रदीप खरात आणि सायबर सेलचे तुषार घरत यांच्या पथकाने केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!