• Tue. Aug 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘मनी लाँड्रिंग व ड्रग्ज तस्करीत नाव…’:डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सेवानिवृत्त वृद्धाची २९.३६ लाखांची लूट

ByEditor

Aug 18, 2026

उरण । अनंत नारंगीकर
सीबीआय, पोलीस अधिकारी आणि तपासाधिकारी असल्याचे भासवत मनी लाँड्रिंगसह अमली पदार्थ तस्करीत नाव आल्याचा बनाव रचून उरण येथील एका ६८ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाची तब्बल २९ लाख ३६ हजार ०९४ रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात अनोळखी भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरण येथील बोरी नाका, सुरूची बिल्डिंग येथे राहणारे निवृत्त नागरिक शांताराम जनार्दन म्हात्रे (६८) यांना १४ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान विविध अनोळखी क्रमांकांवरून फोन आले होते. सुरुवातीला टेलिफोन निगममधून बोलत असल्याचे सांगून एका महिलेने संपर्क साधला. त्यानंतर राजेश प्रधान (तपासाधिकारी), राजेंद्र सिंग (सीबीआय अधिकारी) आणि अनिलकुमार गौतम (पोलीस अधिकारी) अशी खोटी नावे सांगणाऱ्या भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला.

म्हात्रे यांच्या बँक खात्यात ७८ लाख रुपये आले असून मनी लाँड्रिंग, ड्रग्ज तस्कर आणि मानवी तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये त्यांचे नाव जोडले गेल्याचा खोटा दावा संशयितांनी केला. डिजिटल अरेस्ट व अटकेची भीती दाखवून कायदेशीर चौकशीच्या बहाण्याने भामट्यांनी संगनमत करून म्हात्रे यांच्याकडून टप्प्याटप्प्याने २९ लाख ३६ हजार ०९४ रुपये उकळले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर म्हात्रे यांनी तात्काळ उरण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बीएनएस कायदा, भारतीय दंड संहिता (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या विविध कलमांन्वये अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम पोलीस निरीक्षक राहुल काटवाणी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!