जिते गावासह हॉटेल हिमगौरीतील नागरिकांची सुखरूप सुटका; जिल्हा प्रशासनाची तत्परता आणि आपदा मित्रांचे शौर्य
रायगड : बाहेर महापुराचे रौद्ररूप, चोहोबाजूंनी वेढलेले पाणी आणि मदतीच्या प्रतीक्षेत काळजाचा ठोका चुकलेले नागरिक… अशा अत्यंत प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थितीत रायगड जिल्हा प्रशासनाची तत्परता आणि बचाव पथकाच्या अचाट धाडसामुळे पेण तालुक्यातील ४६ नागरिकांना मृत्यूच्या विळख्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मध्यरात्री जिल्हा नियंत्रण कक्षाला मिळालेल्या एका संदेशानंतर सुरू झालेले हे थरारक बचावकार्य पहाटेपर्यंत अखंड सुरू होते.
जिते गावात रात्री २ वाजता बचावकार्य
पेण तालुक्यातील जिते गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून गावात १६ नागरिक अडकल्याचा संदेश रात्री २ वाजता जिल्हा नियंत्रण कक्षाला मिळाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी कार्यालयाने क्षणाचाही विलंब न करता पेणचे तहसीलदार तान्हाजी शेजाळ यांना तात्काळ पावले उचलण्याचे आदेश दिले.
मध्यरात्रीचा संदेश मिळताच तहसीलदार शेजाळ यांनी तातडीने बचाव यंत्रणा गतिमान केली. मुसळधार पाऊस, दाट अंधार आणि पाण्याचा वेगवान प्रवाह अशा कठीण परिस्थितीत नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, आपदा मित्र अभिकेत म्हात्रे, राजेश म्हात्रे, स्थानिक तलाठी व कर्मचाऱ्यांचे पथक यांनी जीवाची पर्वा न करता पहाटेच जिते गाव गाठले. नियोजनबद्ध पद्धतीने राबविलेल्या या मोहिमेत गावात अडकलेल्या सर्व १६ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
”संकट कितीही मोठे असले तरी योग्य समन्वय, तत्पर निर्णय आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर नागरिकांचे जीव वाचविता येतात, हे या मोहिमेने दाखवून दिले.”
हॉटेल हिमगौरीत ३० जण दोरीच्या सहाय्याने सुरक्षित
पहिली मोहीम फत्ते करून बचाव पथक सुटकेचा निःश्वास टाकणार, तोच मुंबई-गोवा महामार्गालगतच्या ‘हॉटेल हिमगौरी’ला पुराच्या पाण्याने वेढल्याची आणि तिथे ३० जण अडकल्याची दुसरी आपत्कालीन वर्दी आली.
क्षणभरही विश्रांती न घेता तहसीलदार शेजाळ यांच्या नेतृत्वाखालील पथक तात्काळ हॉटेल हिमगौरीकडे रवाना झाले. हॉटेलभोवती पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने आत शिरणे अशक्यप्राय होते. मात्र, पथकाने हार न मानता दोरीच्या सहाय्याने (Rope Rescue) सुरक्षित मार्ग तयार केला. हवामान प्रतिकूल असतानाही अत्यंत संयमाने एकामागून एक अशा सर्व ३० पर्यटकांना व कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवले.
समन्वय आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार आणि तहसीलदार तान्हाजी शेजाळ यांच्या टीमने मिळून एकूण ४६ जणांना जीवनदान दिले. संकटाच्या मध्यरात्री जिल्हा नियंत्रण कक्षाने दाखविलेली तत्परता आणि प्रत्यक्ष घटनास्थळी ‘आपदा मित्रांनी’ दाखवलेले शौर्य यामुळे पेणमधील हा मोठा अनर्थ टळला असून, सर्व स्तरांतून या पथकाचे कौतुक होत आहे.
