• Wed. Jul 8th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड: कुसगाव बंधाऱ्यात शेवटची उडी ठरली जीवघेणी; सुहेलचा तिसऱ्या दिवशीही शोध सुरू!

ByEditor

Jul 8, 2026

सागर पेरेकर
रायगड : पावसाळ्यात धरणांवर आणि बंधाऱ्यांवर फिरण्यासाठी जाणे किती धोकादायक ठरू शकते, याची प्रचिती आणणारी एक दुर्दैवी घटना महाड तालुक्यात घडली आहे. टेमघर येथील १९ वर्षीय तरुण सुहेल सलीम शेख हा कुसगाव येथील वहाळेवरील बंधाऱ्यात पोहत असताना बुडाल्याची घटना ५ जुलै रोजी सायंकाळी घडली. घटनेला तीन दिवस उलटून गेले तरी अद्याप सुहेलचा शोध लागलेला नसून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे.

​मित्रांच्या डोळ्यादेखत घडला थरार

​मिळालेल्या माहितीनुसार, सुहेल आपल्या चार मित्रांसह कुसगाव येथील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला होता. सर्वांचे पोहून झाल्यानंतर मित्र पाण्याच्या बाहेर आले. मात्र, सुहेलने ‘शेवटची एक उडी मारतो’ असे म्हणून पुन्हा पाण्यात झेप घेतली. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी दोन मित्रांनी तात्काळ पाण्यात उड्याही मारल्या, सुहेल काही क्षणांसाठी त्यांच्या हातालाही लागला; मात्र बंधाऱ्यावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो हातातून निसटला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

​रेस्क्यू टीमकडून युद्धपातळीवर शोधकार्य

​घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सुहेलचा शोध घेण्यासाठी सध्या ​महाड एमआयडीसी पोलीस दल, ​आपदा मित्र, ​सी स्कॅप (Sea Scap) महाड, ​साळुंखे रेस्क्यू टीम या यंत्रणा संयुक्तपणे काम करत आहेत.

​बंधाऱ्यातील पाण्याची प्रचंड खोली, पावसाने वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि प्रतिकूल हवामान यामुळे सलग तीन दिवस रेस्क्यू टीमला शोधकार्यात मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

​सुहेलचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थ गेल्या तीन दिवसांपासून बंधाऱ्याच्या काठावर तळ ठोकून असून, सुहेल सुरक्षित मिळावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

​प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

​या घटनेची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पावसाळ्यात धरणे, नदीपात्र आणि बंधाऱ्यांवर पाण्याचा वेग अनपेक्षितपणे वाढतो. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः तरुणांनी अशा धोकादायक ठिकाणी जीव धोक्यात घालून पाण्यात उतरू नये, असे कडक आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!