• Wed. Jul 8th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आंदोलनापूर्वीच मोर्चेकऱ्यांना अटक; पोलिसांकडून दि. बा. पाटील नामकरणाच्या मोर्चाला परवानगी नाकारली

ByEditor

Jul 8, 2026

पनवेल: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लाडके नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी काढण्यात येणारा विधिमंडळावरील पायी मोर्चा पोलिसांनी सुरुवातीलाच रोखला.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि प्रकल्पग्रस्तांच्या गटाने बुधवारी सकाळी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून मुंबईच्या दिशेने जाण्याची तयारी केली होती. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारत प्रमुख नेत्यांसह मोर्चेकऱ्यांना तातडीने ताब्यात घेतले. यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार शाब्दिक वाद आणि झटापट झाली, ज्यामुळे पनवेलमध्ये काही काळ तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडून पोलिसांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून हटवले.

​गेल्या दोन आठवड्यांपासून पनवेल आणि उरण परिसरातील गावांमध्ये बैठका घेऊन या मोर्चाची मोठी तयारी सुरू होती. त्यातच काही दिवसांपूर्वी रश्मिता पोपेटा यांनी केलेल्या उपोषणामुळे दि. बा. पाटील नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला होता. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार सुरेश म्हात्रे, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले. आंदोलकांच्या मते, त्यांनी नियमानुसार परवानगी मागितली होती, परंतु ती नाकारून सरकार या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

या आंदोलनाला महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा पाठिंबा नव्हता, त्यामुळेच सरकारने दडपशाहीचा वापर करून आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ते मोडून काढल्याचा थेट आरोप माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केला आहे. पोलिसांनी मोर्चा रोखल्यामुळे सध्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!