गणेश पवार
कर्जत : ऐन दिवाळीच्या सणामध्ये हेले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कशेळे खोंडेवाडीत राहाणारा यशवंत दुंदा हेले नदीत बुडल्याने मृत्यू झाला. शेतातील मोलमजुरीवर भात झोडणीचे काम पूर्ण करून मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी म्हणून यशवंत नदीवर गेला आणि बुडाला. दरम्यान, पट्टीचा पोहणारा यशवंत नदीला असणाऱ्या कमी पाण्यात बुडू कसा शकतो? म्हणून ग्रामस्थांनी संशय व्यक्त केल्याने कर्जत पोलिसांनी यशवंत सोबत असणाऱ्या चार मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दिवाळी सणाची धामधूम सुरू आहे. परंतु, शेतकरी राजा अवकाळी पावसाने चिंतेत सापडला. हातातोंडाशी आलेले भात पीक वाचवण्यासाठी दिवाळी सण बाजूला ठेवून शेतकरी पुन्हा एकदा शेतात राबताना दिसतो. अशातच शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी कर्जत तालुक्यातील कशेळे पाथराज ग्रामपंचायत हद्दीतील खोंडेवाडी येथील राहणारा यशवंत हेले हा मोलमजुरीवर म्हणून गावातील शेतकऱ्याच्या शेतातील भात झोडणीसाठी गेला होता. सोबत पत्नीच्या माहेरच्या गावातील कशेळे दोरेवाडी येथील जिवलग चार मित्र एकत्र होते. शेतातील भात झोडणीचे काम आटपून दुपारी यशवंत व त्याचे चार मित्र असे एकूण पाच जण गावाला लागून वाहणाऱ्या चिल्हार नदीवर पार्टी करण्यासाठी म्हणून गेले होते. सोबत आणलेली दारू पिऊन फुल तर्रर्र…नशेत धुत झालेले पाच जण नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी म्हणून उतरले. दारूच्या नशेत शुद्ध हरवून बसलेले यशवंत व त्याचे मित्र काहीवेळ पाण्यात मौजमजा करीत राहिले, दरम्यान यशवंत सोबतचे चार मित्र नदी बाहेर येत घरी पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास निघून गेले होते. यावेळी घरी गेलेल्या मित्रांपैकी एका मित्राला उशिरा आठवण झाली, यशवंत आपल्या सोबत पाण्याबाहेर आलाच नव्हता. त्यामुळे पुन्हा चार मित्र यशवंतला शोधण्यासाठी रात्री नदीवर पोहचले होते. अंधार झाल्याने यशवंत कुठे दिसत नव्हता. गावातील नागरिक देखील शोधण्यासाठी नदीवर पोहचले होते. याबाबत ग्रामस्थांनी कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कशेळे पोलीस ठाण्यात माहिती देताच रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु, यशवंत कुठे सापडून आला नसल्याने दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी सकाळी येथील ग्रामस्थांना यशवंतचा मृतदेह पाण्यात दिसून आला. पाण्यात बुडालेल्या ठिकाणाहून काही अंतरावर मृतदेह पाण्यात सापडला होता. घटनास्थळी कशेळे पोलीस ताबडतोब हजर झाली होती. यशवंतचा मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने पाण्याबाहेर काढून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी म्हणून पोलिसांनी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले होते.

यशवंत बुडाला त्या ठिकाणी नदी पात्रात पाणी कमी होते, तर यशवंत हा पट्टीचा पोहणारा असल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांना सांगून मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. त्यामुळे अधिक चौकशीसाठी कर्जत पोलिसांनी यशवंत सोबत असलेल्या चार मित्रांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली कशेळे पोलीस ठाण्याचे पोलीस थोरवे आणि राठोड हे करीत आहेत. खोंडेवाडी हे गाव नेरळ पोलीस ठाणे असलेल्या कळंब पोलीस ठाणे अंतर्गत येत असल्याने कळंब पोलिसांना देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. एकूणच यशवंतचा मृत्यू हा अपघात की घातपात? याचा कर्जत पोलीस कसा शोध घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
