वैशाली कडू
उरण : धुतुम ग्रामपंचायत हद्दीत वसलेल्या कंपनीमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जात नाही. इंडियन ऑइल अदानी व्हेंचर लिमिटेड कंपनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही न्याय मिळत नाही. स्थानिकाऐवजी परप्रातियांना प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. त्याच्या निषेधार्थ आज तिसऱ्या दिवशी ही उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहे. आज तहसील उद्धव कदम यांची कंपनी प्रशासन व उपोषणकर्ते यांची बैठक होऊनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. उपोषणकर्ते दोन महिलांची प्रकृती ढासळली आहे. उपोषणाचास तिसरा दिवस असूनही दुपारी २ वाजेपर्यंत डॉक्टर आले नसल्याने उपोषणकर्ते यांच्यात नाराजीचा सूर निघत आहे.
ग्रामपंचायत हद्दीत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील इंडियन ऑईल टॅन्किंग ही रासायनिक द्रव्ये साठवण करणारा प्रकल्प कार्यरत आहे. २५ वर्षांपूर्वी ५७ एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी धुतुम गावातील सुमारे ८३ प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर हा प्रकल्प उभा राहिला आहे. कंपनीमध्ये २७ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत मिळाली आहे, बाकीचे प्रकल्पग्रस्त अद्यापही प्रकल्पात नोकरीच्या मिळण्याच्या आशेवर आहेत.
धुतुम गावात अनेक तरुण -तरुणी उच्चशिक्षित, पदवीधर असतानाही नोकरीत प्राधान्य मिळत नाही. त्यासाठी अनेकवेळा लेखी तोंडी सातत्याने पाठपुरावा करूनही स्थानिका ऐवजी परप्रातियांची मक्तेदारी जास्त आहे. ग्रामपंचायतीच्या पत्राची कोणतीही दखल अदाणी वेंचर्सने घेताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. याच्या निषेधार्थ आजपासून धुतुम ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी कंपनी समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांना माजी आमदार मनोहरशेठ भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, कमळाकर पाटील, कृष्णा घरत, जगजीवन भोईर, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सचिव संतोष पवार, माजो ट्रस्टी भूषण पाटील आदींसह अनेकांनी पाठींबा दर्शविला आहे.
आमरण उपोषण सुरू असल्याने उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी दोन महिलांची प्रकृती ढासळली आहे. उपोषणास तीन दिवस झाल्यानंतर तहसीलदार उद्धव कदम यांनी आज भेट घेतली. त्यानंतर कंपनी प्रशासन व उपोषकर्ते यांच्याबरोबर बैठक झाली. सदर बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने उपोषणकर्ते यांनी माघार न घेता न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. उपोषणकर्ते यांच्यामधील ३ महिलांचो प्रकृती ढासळली आहे. तीन दिवस होऊनही डॉक्टर दुपारी २ वाजेपर्यंत तरी घटनास्थळी आले नव्हते. यामुळे उपोषकर्ते यांच्यात नाराजीचा सूर निघत आहे.
