शशिकांत मोरे
धाटाव : रोह्यात गौराईचे काल जल्लोषात आगमन झाल्यानंतर आज पारंपरिक पद्धतीने मनोभावे पूजन करण्यासाठी महिला वर्गाची चांगलीच लगबग पहावयास मिळाली. नवनवीन विविध रंगाच्या साड्या परिधान करून आज गौराईचे पूजन करताना सुहासिनिची वाण घेताना मोठी लगबग असल्याचे पहावयास मिळाले.

भाद्रपद शुक्ल पक्षात चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असतांना गौरीचे पूजन करतात म्हणून ही ‘ज्येष्ठा गौरी’ म्हणून ओळखली जाते. गौरी म्हणजे हिमालयाची कन्या, भगवान शंकराची पत्नी, गणपतीची माता ‘पार्वती’ होय. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतात नवीन धान्य तयार होते म्हणून गौरी ‘धान्य लक्ष्मीच्या रूपात घरात प्रवेश करते. म्हणून या सणाला प्राचीन काळापासून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सासरी गेलेली मुलगी गौरीच्या सणासाठी माहेरी येत असते. ‘गौराई माझी लाडाची गं!’ असे म्हणत आई आपल्या मुलीचे कौतुकाने स्वागत करीत असते. गौरी पूजनाच्या दिवशी तिला तिच्या आवडीचे पदार्थ जेऊ खाऊ घालीत असते. गौरीचा सण थाटामाटाने साजरा करीत असतांना प्रत्येक स्त्री त्या गौरीमध्ये स्वतःला पाहत असते. म्हणून ज्येष्ठा गौरींचा जिव्हाळ्याचा हा सण अनेक वर्षे परंपरागत पद्धतीने घराघरातून साजरा होत असतो.

आपल्या घरात सुख,समृध्दी नांदावी यासाठी पत्नीने पती, मुलांसाठी गौराईचा ओवसा हा सुहासिनीकडून (वाण) घेतले जातात. कोकणात होळी सणाबरोबर गौरी, गणपती सणाला अनन्य साधारण महत्व आहे. गणपती सणात पूजाअर्चा, आरती बरोबर नैवेद्य आणि रात्री पारंपारिक पद्धतीची जुनी गाणी म्हणत जागरण अशा सर्व बाबीत हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. गणरायाच्या आगमनाबरोबर काल गौराईचे आगमन झाल्यानंतर आज सकाळपासून गौरीचे पूजन करण्यासाठी विविध फुलांनी सजावट करून पूजनासाठी महिलांची लगबग पाहण्याजोग होती.
दरम्यान, जुन्या जाणकार ज्येष्ठ महिलांनी सुरेल आणि संगीतमय गाणी बोलून गौराईचे स्वागत आणि पूजन करण्यासाठी मार्गदर्शन केले. तर याप्रसंगी नवविवाहित दाम्पत्यांनी आपल्या नातेवाईक, सगे सोयरे मंडळींकडे जावून सुहासिनीचे वाण घेतले. एकंदरीत या पारंपारिक पद्धतीने झालेल्या मोठ्या आनंदमय वातावरणात असंख्य महिला वर्गानी आपला आनंद द्विगुणित केल्याचे पहावयास मिळाले.
