प्रसिद्ध बाजारपेठेची वेशीवरच कोंडी; दुर्गंधी आणि धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पोयनाड । ॲड. पंकज पंडित
रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बाजारपेठ आणि मसाला व्यापाराचे केंद्र असलेल्या पोयनाड गावाला आता अवैध डंपिंग ग्राऊंडचा शाप लागला आहे. गावाच्या वेशीवरच बेकायदेशीरपणे कचरा टाकला जात असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, स्थानिक ग्रामपंचायतीच्या कचरा व्यवस्थापनावर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
खेळाडू आणि रहिवाशांचे जगणे असह्य
ज्या ठिकाणी हा कचरा टाकला जात आहे, त्याच्या अगदी शेजारीच ‘झुंझार’चे भव्य क्रीडांगण आहे. येथे जिल्हाभरातून खेळाडू क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धांसाठी येत असतात. मात्र, कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे खेळाडूंना मैदानावर उभे राहणेही कठीण झाले आहे. परिसरात मोठ्या हौसिंग सोसायट्या, रुग्णालये आणि हॉटेल-रिसॉर्ट्स असून, या दुर्गंधीचा फटका स्थानिक रहिवासी तसेच पर्यटकांनाही बसत आहे.
आजारांचे निमंत्रण आणि धुराचे लोट
डंपिंग ग्राऊंडवर साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात चिकनगुनिया, मलेरिया आणि डेंग्यूसारख्या जीवघेण्या साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. त्यातच, या कचऱ्याला वारंवार आग लावली जात असल्याने परिसरात सतत धुराचे साम्राज्य असते. या विषारी धुरामुळे श्वसनाचे विकार जडण्याची भीती व्यक्त होत असून, आबालवृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?
स्थानिक ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिक आणि खेळाडूंमध्ये तीव्र संताप आहे. “एवढ्या मोठ्या बाजारपेठेच्या गावाची ही दुर्दशा प्रशासनाला दिसत नाही का?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.
आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने तात्काळ हे अवैध डंपिंग ग्राऊंड हटवून कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी, अशी मागणी जोर धरत आहे. जर येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, तर पोयनाडमधील नागरिक आणि खेळाडू रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
“प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या पोयनाडची ही अवस्था दुर्दैवी आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक गुदमरले असून प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही.”
— स्थानिक नागरिक व खेळाडू, पोयनाड
