सलीम शेख
माणगाव : नायक मराठा ज्ञाती मंडळ निजामपूर विभाग सचिव पदाचा राजीनामा दिला म्हणणारे जनार्दन शिलिमकर यांना समाजाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो असे मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण महाळुंगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
निजामपूर येथे २४ ऑक्टोबर रोजी नायक मराठा ज्ञाती मंडळ निजामपूर विभाग यांच्यातर्फे आ.भरत गोगावले यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सामाजिक कार्यक्रमाला राजकीय स्वरूप दिले गेले असल्याचा आरोप जनार्दन शिलिमकर यांनी दि.२५ ऑक्टोबर रोजी निजामपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला होता. या वृत्ताचा नायक मराठा ज्ञाती मंडळ निजामपूर विभाग अध्यक्ष लक्ष्मण महाळुंगे,समाजेचे जेष्ठ नेते दत्तूशेठ पवार,राजाभाऊ रणपिसे यांनी शनिवार दि.२६ ऑक्टोबर रोजी निजामपूर येथे घेतलेल्या परिषदेत खरपूस समाचार घेतला. या पत्रकार परिषदेला जेष्ठ नेते मारुती पावर, सुधीर पवार, मारुती मोकाशी, संजय गुळंबे,अविनाश नलावडे, ज्ञानेश्वर रणपिसे, प्रकाश रणपिसे, रमेश दबडे, राजेश कदम, गणेश पवार, प्रदीप पवार, दिपक शेडगे, बाबू पाखड, मंगेश बटावले, अनिल नलावडे आदींसह समाज बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत बोलताना मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण महाळुंगे पुढे म्हणाले की, दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी नायक मराठा ज्ञाती मंडळ निजामपूर विभागाच्या झालेल्या जनरल सभेच्या कार्यकारणीच्या निर्णयानुसार मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आ.भरत गोगावले यांचा निजामपूर येथे दि.२४ ऑक्टोबर रोजी सत्कार समारंभ घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार हा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाला विभागातील २००० समाज बांधव उपस्थित राहून कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. या सत्काराबाबत जनार्दन शिलिमकर व अनिल मोरे हे समाजामध्ये चुकीचा संभ्रम पसरवीत आहेत. तरी नायक मराठा ज्ञाती मंडळ निजामपूर विभाग सचिव पदाचा राजीनामा दिला म्हणणारे जनार्दन शिलिमकर यांना समाजाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो असे ते म्हणाले. समाजाचे जेष्ठ नेते दत्तूशेठ पवार यावेळी बोलताना म्हणाले दि. २४ ऑक्टोबर रोजी आ.भरत गोगावले यांचा निजामपूर येथे सत्कार समारंभ कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला विभागातील समाजाचे ९५ टक्के समाज बांधव उपस्थित होते. आ. भरत गोगावले यांच्यावर बोलण्याचा अधिकार या लोकांना नाही.
जेष्ठ नेते राजाभाऊ रणपिसे यावेळी बोलताना म्हणाले की, जनार्दन शिलिमकर यांना समाजाविषयी बोलण्याचा अधिकार नाही. ते समाजाच्या बैठकीला येत नाही. आ. भरत गोगावले यांच्याबाबत अपप्रचार केल्याने मी त्यांचा निषेध करतो. आम्ही विधानसभा निवडणुकीत आ. भरत गोगावले यांना जाहीर पाठिंबा देऊ. विरोधक करीत असलेल्या टीकेला जाहीर सभांतून आम्ही सडेतोड उत्तर देऊ असेही ते म्हणाले.