• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

घरगुती गॅसचा पुरवठा नियमित, नागरिकांनी घाबरून जाऊ नये -जिल्हाधिकारी किशन जावळे

ByEditor

Mar 13, 2026

दोन सिलिंडर बुकिंगमध्ये २५ दिवसांचे अंतर अनिवार्य; जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यास कारवाईचा इशारा

रायगड : सध्या मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या तुटवड्याबाबत काही ठिकाणी अफवा पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. तथापि, संपूर्ण जिल्ह्यातील घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही. घरगुती वापरासाठी वितरित करण्यात येणारा एलपीजी गॅस केवळ घरगुती कारणांसाठीच वापरणे बंधनकारक आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक अथवा इतर अनधिकृत वापर होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्ती किंवा आस्थापनांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार साठेबाजी व काळाबाजार रोखण्याकरीता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दोन बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचा कालावधी आवश्यक करण्यात आला आहे. त्यामुळे एका सिलेंडरचे वितरण झाल्यानंतर २५ दिवस पूर्ण झाल्यानंतरच पुढील सिलेंडरचे बुकिंग करता येईल.

रायगड जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडर चा पुरवठा सुरळीत असल्याने घरगुती गॅसच्या पुरवठ्याबाबत नागरीकांनी चिंताग्रस्त होण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी घरगुती गॅसचा अनावश्यक साठा करून ठेवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवून घाईगडबडीत गॅस घेण्याचा प्रयत्न करू नये. घरगुती गॅस च्या पुरवठ्याबाबत काही तक्रार असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षातील ०२१४१-२२७४५२या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

घरगुती गॅसचा पुरवठा नियमितपणे सुरू असून नागरिकांनी संयम राखावा व प्रशासनास सहकार्य करावे. रायगड जिल्ह्यात घरगुती गॅसचा तुटवडा नसल्याने नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!