• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये द्रोणागिरी नोड येथील जीडीएल यार्डाजवळ भीषण आग; तीन अवजड वाहने खाक

ByEditor

Mar 13, 2026

दुपारच्या सुमारास अचानक भडका; जीवितहानी टळली, धुराच्या लोटामुळे परिसरात घबराट

उरण । अनंत नारंगीकर
द्रोणागिरी नोड परिसरातील जीडीएल (GDL) माल हाताळणी यार्डाजवळ उभ्या असलेल्या अवजड वाहनांना शुक्रवारी (दि. १३) दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत तीन वाहने पूर्णपणे जळून खाक झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट उसळल्याने वाहनचालक आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास जीडीएल यार्डच्या पार्किंग परिसरात काही अवजड वाहने उभी होती. यावेळी एका वाहनाला अचानक आग लागली आणि वाऱ्यामुळे या आगीने शेजारील इतर दोन वाहनांनाही आपल्या कचाट्यात घेतले. आगीचा भडका इतका मोठा होता की, काही वेळातच तीनही वाहने आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

सदर आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे किंवा उष्णतेमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आग अधिक पसरण्याआधीच विझवण्यात आली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

गेल्या काही दिवसांपासून वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर, वाहनचालकांनी आपल्या वाहनांची वेळोवेळी तांत्रिक तपासणी करावी आणि खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. द्रोणागिरी नोडसारख्या वर्दळीच्या आणि मालवाहतुकीच्या ठिकाणी अशा घटना घडत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!