पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना गावकऱ्यांची होरपळ; वर्षानुवर्षे दुरुस्ती रखडल्याने संताप
श्रीवर्धन । अनिकेत मोहित
२०२० मधील ‘निसर्ग’ आणि २०२१ मधील ‘तौक्ते’ वादळाने श्रीवर्धन तालुक्याला मोठा तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीत अनेक गावांमधील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, ज्यामध्ये अंत्यसंस्कारासाठी असलेल्या शवदाहिन्यांवरील शेडचाही समावेश होता. मात्र, या घटनांना चार-पाच वर्षे उलटूनही तालुक्यातील अनेक गावांतील शवदाहिन्यांची दुरुस्ती झालेली नाही. सद्यस्थितीत मोडकळीस आलेल्या या शेडमुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना गावकऱ्यांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत.
पावसात अंत्यसंस्काराची परवड
कोकणात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करणे अशक्य असते. वादळात अनेक ठिकाणचे पत्रे उडून गेले आहेत, तर काही ठिकाणी सांगाडे कोसळण्याच्या स्थितीत आहेत. पाऊस सुरू असताना अंत्यविधी पार पाडताना नातेवाईक आणि ग्रामस्थांना ताडपत्री धरून किंवा पावसात भिजत उभे राहावे लागते. मृताच्या पश्चात होणारी ही विटंबना पाहून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाचा ‘काणाडोळा’
या गंभीर प्रश्नाबाबत श्रीवर्धनमधील विविध ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाकडे वेळोवेळी लेखी तक्रारी केल्या आहेत. पाठपुरावा करूनही निधीचा अभाव किंवा तांत्रिक कारणांचे दाखले देऊन ही कामे प्रलंबित ठेवली जात आहेत. लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाने या संवेदनशील विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
वादळानंतर अनेक वर्षे उलटली तरी साध्या शेडची दुरुस्ती का होऊ शकली नाही? अत्यावश्यक सुविधेसाठीही ग्रामस्थांना आंदोलनाची भाषा का करावी लागते? पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्याने आता भर पावसात अंत्यविधी कसे उरकायचे? “माणूस जिवंत असताना त्याला सोयीसुविधा मिळणे कठीण झाले आहेच, पण मृत्यूनंतर शेवटचा निरोप देतानाही जर सन्मान मिळत नसेल, तर प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार नक्की कोणासाठी? अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील कामात होणारी दिरंगाई दुर्दैवी आहे,” असे मत श्रीवर्धनमधील संतप्त ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
