• Tue. Jul 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ताम्हिणी घाट २५ दिवसांपासून ठप्प; रायगडचे अर्थकारण आणि पर्यटन धोक्यात

ByEditor

Jul 28, 2026

३१ जुलैपर्यंत मार्ग सुरू करण्याचे खा. सुनील तटकरेंचे आश्वासन; तर तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा संताजी पवारांचा इशारा

माणगाव । सलीम शेख
पुणे-माणगाव-दिघी आंतरराष्ट्रीय बंदराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा ताम्हिणी घाट मार्ग गेल्या २५ दिवसांपासून बंद असल्याने रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक व पर्यटन क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला आहे. ५ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्याच्या हद्दीत रस्त्याचा काही भाग खचला, तर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारीतील या मार्गाची दुरुस्ती अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पर्यटन आणि व्यापाराचा कणा मोडला

सन २००१ मध्ये वाहतुकीसाठी खुला झालेला ताम्हिणी घाट मार्ग हा पुणे आणि कोकण यांना सर्वात कमी अंतरात जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हजारो पर्यटक कोकणातील समुद्रकिनारे व धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. तसेच, दिघी आंतरराष्ट्रीय बंदराशी हा मार्ग जोडला गेल्याने त्याचे आर्थिक महत्त्वही वाढले आहे. औद्योगिक मालाची ने-आण आणि शिक्षणासाठी पुण्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त आहे. मात्र, सध्या रस्ता बंद असल्यामुळे प्रवाशांना खोपोली-लोणावळा मार्गे मोठा वळसा घालावा लागत असून वेळ आणि खर्च या दोन्हीत मोठी वाढ झाली आहे.

कोट्यवधींची उलाढाल ठप्प

ताम्हिणी घाट बंद झाल्याचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला बसला आहे. ऐन पर्यटन हंगामात हॉटेल, रिसॉर्ट, होमस्टे, रेस्टॉरंट, पेट्रोलपंप आणि लघुउद्योजकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. पर्यटनावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उत्पन्नात घट झाल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.

३१ जुलैपर्यंत रस्ता सुरू होणार – खा. सुनील तटकरे

दरम्यान, नुकत्याच गीता बाग येथे आयोजित एका कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांनी ताम्हिणी घाट बंद असल्याने रायगडमधील पर्यटन व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती खा. तटकरे यांनी नागरिकांना दिली. असे असले तरी, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून मार्ग तातडीने सुरू करावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा

“ताम्हिणी घाट मार्ग हा रायगडच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेचा जीवनदायी दुवा आहे. हा घाट २५ दिवसांपासून बंद आहे आणि प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. यामुळे हॉटेल, होमस्टे, दुकानदार आणि विद्यार्थ्यांचे जे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे, ते कोण भरून देणार? जनता आणि व्यावसायिक वेठीस धरले गेले आहेत. एमएसआरडीसीच्या या निष्क्रियतेला आता जनता माफ करणार नाही. पुणे हद्दीतील खचलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून मार्ग सुरू करावा; अन्यथा जनतेच्या हितासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय राहणार नाही.”
-संताजी पवार (व्यावसायिक तथा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, श्रीवर्धन विधानसभा)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!