• Wed. Jul 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धनमधील ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोकाट जनावरे व घोड्यांचा ठिय्या; अनेक गंभीर अपघातांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष

ByEditor

Jul 28, 2026

श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण तसेच मुख्य रस्त्यांवर सध्या मोकाट गुरे आणि घोड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत आहे. पावसामुळे दृश्यमानता कमी होते आणि रात्रीच्या अंधारात रस्त्यावर बसलेली गुरे अथवा घोडे वेळेवर न दिसल्याने अपघात होण्याचा धोका अधिक वाढला आहे.

श्रीवर्धनला जोडणाऱ्या अनेक अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर गायी, बैल आणि घोडे मुक्तपणे फिरताना किंवा रस्त्याच्या मधोमध बसलेले दिसून येतात. त्यामुळे अनेकदा वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावा लागतो. रस्ते निसरडे असल्याने वाहने घसरून अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आतापर्यंत मोकाट गुरे आणि घोड्यांना धडकून तालुक्यात अनेक गंभीर अपघात झाले असून काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत तसेच वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही पशुपालक स्वतःची जनावरे दिवसभर मोकाट सोडून देतात. स्वतःचे काम होईपर्यंत या मुक्या जनावरांचा उपयोग करून घेतला जातो आणि उपयोग संपल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. त्यामुळे जनावरांचे हाल तर होतातच, पण त्यांचा जीवही धोक्यात येतो आणि रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या निष्पाप नागरिकांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण होतो.

या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मोकाट जनावरे आणि घोड्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी, जनावरांसाठी कोंडवाड्याची प्रभावी व्यवस्था करावी आणि रस्त्यांवरील हा जीवघेणा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून होत आहे. एखादा मोठा जीवितहानीचा अपघात घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा प्रशासनाने आताच ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!