रायगडमधील मंडल अधिकाऱ्याच्या अटकेचा निषेध; नागरिक तासनतास ताटकळत, संपाने कामाचा खोळंबा
उरण । अनंत नारंगीकर
रायगड जिल्ह्यातील एका मंडल अधिकाऱ्याला करण्यात आलेल्या अटकेच्या निषेधार्थ उरण तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि. २७) अचानक कामबंद आंदोलन पुकारले. कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या या संपामुळे उरण तहसील कार्यालयाला चक्क टाळे ठोकण्यात आले होते. संपाची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने प्रशासकीय कामांसाठी आलेल्या शेकडो नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.
सोमवारी सकाळपासूनच तहसील कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला. विविध प्रकारचे शासकीय दाखले, जमिनींचे फेरफार, सातबारा उतारे आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी दूरवरच्या ग्रामीण भागातून नागरिक आले होते. मात्र, कार्यालयाच्या मुख्य दरवाजालाच टाळे असल्याचे पाहून नागरिकांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे उपस्थित नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
तहसीलदारांशी संपर्क नाही
या अचानक सुरू झालेल्या संपाबाबत आणि आंदोलन किती दिवस चालणार याविषयी अधिकृत माहिती घेण्यासाठी उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
संपाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याने नागरिकांची प्रलंबित कामे आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. वरिष्ठ प्रशासनाने या प्रकरणी तातडीने मध्यस्थी करून तोडगा काढावा आणि महसूल सेवा पूर्ववत करावी, अशी जोरदार मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.
