• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुकीची तयारी; मतदार यादी कार्यक्रम जाहीर

ByEditor

Mar 13, 2026
oplus_2

दिघी । गणेश प्रभाळे
श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य किंवा थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश श्रीवर्धन तहसील कार्यालयाकडून मंडळ अधिकारी, तलाठी आणि संबंधित ग्रामसेवकांना देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतींतील रिक्त पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. यामध्ये तालुक्यातील आदगाव, वाकलघर, बागमांडला, हरवित, दांडगुरी, सायगाव, भरडखोल, शेखाडी, साखरोणे, कुडगाव आणि दिवेआगर या ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यात येणार असून त्यासाठी १ जुलै २०२५ रोजीची मूळ मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींसाठीची मूळ मतदार यादी १० फेब्रुवारी २०२६ रोजी तहसील कार्यालय, श्रीवर्धन येथे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर नागरिकांना हरकती व सूचना नोंदविण्यासाठी १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुदत देण्यात आली आहे. प्राप्त हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम मतदार यादी मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

तहसीलदारांनी संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवकांना आदेशानुसार मतदार यादी तयार करून विहित नमुन्यात चार प्रतींमध्ये तहसील कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांमार्फत ग्रामसेवकांना आवश्यक सूचना देऊन बैठकीस उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असून या प्रक्रियेचा बजावणी अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून संबंधित गावांमध्ये निवडणुकीची हालचाल सुरू झाली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!