• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सत्तेच्या समीकरणांपेक्षा ‘पाणी’ महत्त्वाचे! पहिल्याच दिवशी पल्लवी भोईर व प्रसाद भोईर आक्रमक; पेण खारेपाटासाठी कंबर कसली

ByEditor

Mar 13, 2026

अलिबाग (विशेष प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेत सध्या सत्तेची गणिते जुळवण्यात आणि अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर कोण बसणार, याची चर्चा रंगली असतानाच, पेण खारेपाटातील प्रतिनिधींनी मात्र सत्तेपेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. जिल्हा परिषद सदस्या पल्लवीताई प्रसाद भोईर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद दादा भोईर यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नेहा भोसले यांची भेट घेऊन पेण खारेपाटातील पाण्याचा ज्वलंत प्रश्न ऐरणीवर आणला.

पहिल्याच दिवशी जनहिताचा ‘अजेंडा’

नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी आणि सत्तेच्या हालचाली सुरू असताना, पल्लवी भोईर यांनी कोणतीही प्रतीक्षा न करता थेट प्रशासकीय प्रमुखांचे दार ठोठावले. पेण खारेपाटातील गावांना होणारा पाणीपुरवठा आणि तेथील नागरिकांचे हाल याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी रीतसर निवेदन देत, हा विषय आगामी सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेण्याबाबत ठराव दाखल केला.

प्रमुख मागण्या काय आहेत?

खारेपाट भागातील पाण्याचे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी भोईर दांपत्याने खालील तांत्रिक व प्रशासकीय मागण्या CEO नेहा भोसले यांच्याकडे मांडल्या आहेत:

सविस्तर आढावा: खारेपाटातील सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर अहवाल तयार करणे.

तांत्रिक ऑडिट: वितरण प्रणाली आणि जुन्या पाइपलाइनचे तांत्रिक ऑडिट (Technical Audit) करून गळती व त्रुटी शोधणे.

पारदर्शकता: ऑडिटचा अहवाल जिल्हा परिषदेसमोर सादर करून त्यावर तातडीने उपाययोजना करणे.

नियोजन: प्रत्येक गावनिहाय पाणीपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करणे, जेणेकरून जनतेची पायपीट थांबेल.

“सत्ता येत जात राहील, पण जनतेचा पाण्याचा हक्क आमच्यासाठी सर्वोच्च आहे. खारेपाटातील माता-भगिनींची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवणे हेच आमचे पहिले कर्तव्य आहे.”
प्रसाद भोईर (रायगड जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना-ठाकरे गट)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!