अलिबाग | प्रतिनिधी
बाळाच्या जन्माचा आनंद साजरा होत असतानाच एका दुर्दैवी घटनेने अलिबाग जिल्हा रुग्णालय परिसरात शोककळा पसरली आहे. प्रसूतीनंतर अवघ्या काही तासांतच ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, आई विना पोरके झालेल्या नवजात बाळामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
मूळचे श्रीवर्धन येथील आणि सध्या कुरुळ (अलिबाग) येथे वास्तव्यास असलेले विशाल विश्वनाथ दुर्गावले यांच्या पत्नी विवा विशाल दुर्गावले (३२) यांना गरोदरपणामुळे ९ मार्च २०२६ रोजी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ११ मार्च रोजी पहाटे दोनच्या सुमारास विवा यांनी एका बाळाला जन्म दिला. सुरुवातीला प्रसूती सुखरूप झाल्याचे सांगण्यात आले, मात्र काही वेळातच त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला.
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
विवा यांची प्रकृती वेगाने बिघडल्याने त्यांना तत्काळ अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले, तर नवजात बाळाला खबरदारी म्हणून ‘स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट’मध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र १२ मार्च रोजी संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास विवा यांचा मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वीच विवाह झालेल्या या दाम्पत्याच्या आयुष्यात आलेल्या पहिल्या अपत्याचा आनंद मातेच्या मृत्यूने हिरावला गेला आहे.
नातेवाईकांचा संताप आणि पोलिसांत धाव
या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. उपचाराबाबत शंका उपस्थित करत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रुग्णालयातील सुविधा आणि वैद्यकीय हलगर्जीपणाबाबत या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस आणि आरोग्य विभागामार्फत केला जात आहे.
