रोहा | प्रतिनिधी
जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याच्या वावड्या उठत असल्या तरी, प्रत्यक्षात तालुक्यात एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि संयम राखावा, असे आवाहन रोह्याचे तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांनी केले आहे.
२५ दिवसांच्या अंतरानेच मिळणार सिलेंडर
पेट्रोलियम मंत्रालय आणि तेल कंपन्यांच्या (BPCL, HPCL) नियमानुसार, गॅसची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी दोन सिलेंडरच्या बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचा कालावधी असणे अनिवार्य आहे. एका सिलेंडरच्या वितरणानंतर २५ दिवस पूर्ण झाल्याशिवाय पुढील सिलेंडर बुक करता येणार नाही. वितरकांनाही बुकिंगनंतर विहित मुदतीत सिलेंडर घरपोच करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
व्यावसायिक वापरास सक्त मनाई
घरगुती वापरासाठीचा गॅस केवळ घरासाठीच वापरणे बंधनकारक आहे. काही ठिकाणी घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक किंवा इतर अनधिकृत कामांसाठी वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्थांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदारांनी दिला आहे.
प्रशासनाचे आवाहन
- नागरिकांनी गॅसचा अनावश्यक साठा करू नये.
- कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्यास थेट आपल्या गॅस एजन्सीशी संपर्क साधावा.
- घाईगडबडीत गॅस घेण्याचा प्रयत्न करून गोंधळ निर्माण करू नये.
तालुक्यात गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याने नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
