• Thu. Mar 12th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावच्या कन्येची उत्तुंग भरारी! अपेक्षा शेट्टीचा जम्मू ते कन्याकुमारी ४००० किमीचा धाडसी ‘सोलो’ प्रवास

ByEditor

Mar 12, 2026

माणगाव | सलीम शेख
काश्मीरच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांपासून ते कन्याकुमारीच्या अथांग समुद्रकिनाऱ्यापर्यंतचा प्रवास करण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात, मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचे धाडस मोजकेच जण करतात. माणगावची कन्या अपेक्षा राय-शेट्टी हिने तब्बल ४००० किलोमीटरचा खडतर ‘सोलो’ (एकल) प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करून नवा इतिहास रचला आहे. तिच्या या धाडसी मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

१२ राज्यांतून भारताची संस्कृती अनुभवली

भारताच्या उत्तर ते दक्षिण टोकाला जोडणाऱ्या या महाप्रवासात अपेक्षाने १२ राज्यांचा प्रवास केला. यामध्ये जम्मू, पंजाब, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. या प्रवासादरम्यान तिने भारताची विविधता आणि संस्कृती जवळून अनुभवली. हा प्रवास केवळ अंतर कापण्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो जिद्द आणि आत्मविश्वासाची मोठी परीक्षा घेणारा ठरला.

अडथळ्यांवर मात करत गाठले लक्ष्य

एकटीने इतक्या लांबचा प्रवास करताना रस्त्यावरील अनिश्चितता, हवामानातील बदल आणि शारीरिक थकवा अशा अनेक आव्हानांचा तिने धैर्याने सामना केला. “मर्यादा आपणच आखतो, पण धाडस केले तर त्या मोडून पुढे जाता येते,” अशी भावना तिने या यशानंतर व्यक्त केली. रस्ते सुरक्षा, जबाबदारीचे भान आणि सतत पुढे जाण्याची जिद्द या त्रिसूत्रीमुळे हा प्रवास यशस्वी झाल्याचे तिने सांगितले.

माणगावचा अभिमान

अपेक्षा शेट्टीचे बालपण आणि शिक्षण माणगावमध्येच झाले आहे. तिने माणगाव कनिष्ठ महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. ती माणगावातील श्रद्धा इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका हेगडे मॅडम यांची सुकन्या आहे. सध्या ती मुंबईतील ‘के. रहेजा कॉर्प’ (BKC) या नामांकित संस्थेत ‘लर्निंग अँड डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट’ म्हणून कार्यरत आहे. व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत तिने जोपासलेला हा साहसी छंद आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

स्वतःवर विश्वास असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नसते, हेच अपेक्षाने आपल्या या साहसी मोहिमेतून सिद्ध करून दाखवले आहे. तिच्या या यशामुळे माणगाव शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!