• Thu. Mar 12th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दाट धुक्याच्या विळख्यात उरण; जनजीवन विस्कळीत, बंदरातील कामकाजालाही ‘ब्रेक’

ByEditor

Mar 12, 2026

उरण | घनःश्याम कडू
उरण परिसरात आज पहाटेपासूनच दाट धुक्याची चादर पसरल्याने संपूर्ण जनजीवन काही काळासाठी पूर्णपणे कोलमडले. धुक्याचा जोर इतका प्रचंड होता की, हाकेच्या अंतरावरील वस्तूही दिसेनाशी झाल्याने रस्ते वाहतूक मंदावली, तर जेएनपीए बंदर परिसरातील कामकाजावरही याचे सावट पाहायला मिळाले.

रस्त्यांवर ‘झिरो विजिबिलिटी’; वाहनचालकांची कसरत

पहाटेच्या सुमारास अचानक पसरलेल्या धुक्यामुळे रस्त्यांवरील दृश्यता (व्हिजिबिलिटी) अत्यंत कमी झाली होती. मुंबई-पुणे मार्ग आणि उरणमधील मुख्य रस्त्यांवर समोरून येणारे वाहनही दिसत नसल्याने वाहनचालकांची मोठी धावपळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक चालकांनी वाहनांचे हेडलाईट्स आणि इंडिकेटर्स सुरू ठेवून अत्यंत धीम्या गतीने प्रवास केला. धुक्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाल्याने काही काळ रस्त्यांवरील वाहतूक रेंगाळली होती.

बंदरातील कामकाज काही काळ ठप्प

या धुक्याचा मोठा फटका उरणमधील बंदर परिसरालाही बसला. धुक्यामुळे समुद्रातील आणि बंदरातील हालचाली स्पष्ट दिसत नसल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कंटेनरची वाहतूक आणि जहाजांचे कामकाज काही काळासाठी थांबवण्यात आले होते. यामुळे बंदर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

दुपारनंतर परिस्थिती पूर्ववत

सकाळी १० वाजेनंतर धुक्याची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागली. सूर्यप्रकाश पडल्यानंतर धुके ओसरले आणि वाहतूक संथ गतीने पूर्ववत झाली. बंदरातील थांबलेले कामकाजही पुन्हा सुरू झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे उरणकरांना सकाळच्या सत्रात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!