अलिबाग : विशेष प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणात गुरुवारी ऐतिहासिक सत्तांतर पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मंगेश रामचंद्र वाकडीकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदावर भाजपचा उमेदवार विराजमान झाला असून, जिल्ह्याच्या राजकारणात हे एक मोठे यश मानले जात आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रायगड जिल्हा परिषदेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. ५९ सदस्य संख्या असलेल्या या सभागृहात शिवसेना शिंदे गटाला २१, राष्ट्रवादी काँग्रेसला १६, भाजपला १५, शिवसेना ठाकरे गटाला ५ आणि काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या. सत्तेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गट या तिन्ही पक्षांनी एकत्र येत ‘महायुती’ स्थापन केली. या महायुतीमुळेच जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला.
गुरुवारी (दि. १२) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदासाठी पनवेलचे मंगेश वाकडीकर आणि उपाध्यक्षपदासाठी रोह्यातील मधुकर पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. अन्य कोणताही अर्ज न आल्यामुळे अपर जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी सुनील थोरवे यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.
या निवडीवेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी अध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील, भाजपचे गटनेते वैकुंठ पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील, शिवसेनेच्या गटनेत्या मानसी दळवी यांच्यासह दिलीप भोईर, अनंत गोंधळी, विकास गोगावले, चंद्रकांत कळंबे आदी मान्यवर उपस्थित होते. निवडीची घोषणा होताच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाके फोडून मोठा जल्लोष साजरा केला.
