केगावमधील घरांवर धाड; पण धुतुममधील अनधिकृत कंटेनर यार्डांवर मेहेरबानी का? उरणकरांचा संतप्त सवाल
उरण । घनःश्याम कडू
उरण तालुक्यातील केगाव येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला बुधवारी ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. मोठा पोलीस बंदोबस्त आणि अधिकाऱ्यांच्या लवाजम्यासह धडकलेल्या सिडकोच्या पथकाला कोणतीही कारवाई न करताच रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले. या घडामोडीमुळे केगाव परिसरात काही काळ तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ आक्रमक
कारवाईची बातमी समजताच पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे, उपनगराध्यक्ष रवी भोईर, नितीन पाटील, कमळाकर तांबोळी, राजेंद्र ठाकूर, पराग काठे, चिंतामण पाटील, सुनील नाईक, जगजीवन नाईक, महेश तांबोळी यांच्यासह केगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि शेकडो ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सिडको अधिकाऱ्यांना कारवाईचा कायदेशीर आधार, पूर्वसूचना नोटीस आणि संबंधित कागदपत्रांची विचारणा करत कारवाईला जोरदार विरोध दर्शवला.
नेव्हीच्या तक्रारीवरून कारवाई; संयुक्त बैठकीची मागणी
यावेळी सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी रजपूत यांनी भारतीय नौदलाकडून (नेव्ही) प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. यावर सभापती महेश म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेत, “तहसीलदारांच्या उपस्थितीत सिडको, नेव्ही, महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांची तातडीने संयुक्त बैठक घेण्यात यावी. सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतरच काय तो निर्णय घ्यावा,” अशी ठाम मागणी केली. ग्रामस्थांचा वाढता आक्रोश पाहून सिडको पथकाने अखेर माघार घेतली.
गटविकास अधिकाऱ्यांचे हात वर
सिडकोचे पथक माघारी फिरल्यानंतर संतप्त ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी थेट उरण पंचायत समिती गाठून गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील व ग्रामविस्तार अधिकारी विनोद मिंडे यांना जाब विचारला. मात्र, या कारवाईची प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती असे सांगत गटविकास अधिकाऱ्यांनी हात वर केले; तसेच वरिष्ठ स्तरावर काय निर्णय झाला, याची आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिडकोच्या दुटप्पी धोरणावर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर उरण तालुक्यात सिडकोच्या कारभारावर आणि दुटप्पी भूमिकेवर तीव्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. केगावमधील स्थानिकांच्या निवासी घरांवर कारवाई करण्यासाठी तातडीने धाव घेणारे सिडको प्रशासन, धुतुम आणि आसपासच्या परिसरात अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत कंटेनर यार्ड्स व पार्किंग व्यवसायांवर कारवाई का करत नाही? असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. धुतुम परिसरात अनेक एकर जमिनीवर पसरलेल्या या अनधिकृत कंटेनर यार्ड्समधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असूनही सिडको दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाच्या हेतूवर शंका व्यक्त केली जात आहे.

केगावच्या घटनेनंतर आता सिडकोने धुतुमसह संपूर्ण उरण परिसरातील सर्व अनधिकृत व्यावसायिक बांधकामांवर समान निकषांनुसार कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता नेव्हीच्या तक्रारीचे नेमके स्वरूप काय समोर येते आणि प्रस्तावित संयुक्त बैठकीत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण उरण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
