सभापतीपदी शिवसेनेचे विलास शिंदे, उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा मालोरे बिनविरोध
माणगाव । सलीम शेख
माणगाव पंचायत समितीवर शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने सत्ता स्थापन केली असून सभापतीपदी शिवसेनेचे विलास यशवंत शिंदे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा संदेश मालोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माणगाव पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी झाली होती. या निवडणुकीत आठपैकी पाच जागांवर शिवसेना (शिंदे गट) चे सदस्य निवडून आले होते. त्यामुळे पंचायत समितीत शिवसेनेने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. राज्यात महायुतीची सत्ता असल्याने माणगाव पंचायत समितीत शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी एकत्र येत महायुती कायम ठेवली.
सभापती व उपसभापती पदासाठीची निवडणूक बुधवार, ११ मार्च २०२६ रोजी पंचायत समिती माणगाव येथील ‘महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात’ पार पडली. या निवडणूक प्रक्रियेसाठी प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील उपस्थित होते.
सभापती पदासाठी पाटुणूस पंचायत समिती गणातून निवडून आलेले शिवसेनेचे विलास यशवंत शिंदे, तर उपसभापती पदासाठी तळाशेत गणातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा संदेश मालोरे यांचेच एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. प्राधिकृत अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी अधिकृत घोषणा करून नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले.
या वेळी माणगाव पंचायत समितीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य व सदस्या तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शेखरशेठ देशमुख, माजी सभापती ज्ञानदेव पवार, माजी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काका नवगणे, तालुकाप्रमुख अॅड. महेंद्र माणकर, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, भाजप दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, नवनिर्वाचित राजिप सदस्य अविनाश नलावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश मालोरे, युवानेते निलेश केसरकर, जगदीश दोशी, हुसेन राहटविलकर, प्रसाद धारिया, डॉ. परेश उभारे, फैमिद जामदार आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
