मुंबईतील हायव्होल्टेज बैठकीत सत्तेचा फॉर्म्युला निश्चित; पेण तालुक्याला अध्यक्षपदाची संधी?
अलिबाग : विशेष प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेबाबत निर्माण झालेला राजकीय तिढा अखेर सुटला आहे. मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत रायगडमध्ये ‘महायुती’ची सत्ता स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे (शिंदे गट) सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय अनिश्चिततेला पूर्णविराम मिळाला आहे.
वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्यातील महायुतीचा पॅटर्न जिल्ह्यातही राबवण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. या प्रक्रियेत उद्योगमंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले यांनी महत्त्वाची मध्यस्थी केल्याचे समजते. यापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र हालचाली सुरू केल्याच्या चर्चा होत्या, मात्र वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे आता शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित सत्तेत येणार आहेत.
असे असेल सत्तेचे समीकरण
ठरलेल्या सूत्रानुसार, पहिल्या सव्वा वर्षासाठी अध्यक्षपद भाजपकडे राहील. ५९ सदस्य संख्या असलेल्या रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी ३१ सदस्यांच्या बहुमताची आवश्यकता आहे. सध्याचे पक्षीय बलाबल पाहता महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे:
- शिवसेना (शिंदे गट): २१ सदस्य
- राष्ट्रवादी काँग्रेस: १६ सदस्य
- भारतीय जनता पार्टी: १५ सदस्य
(एकूण महायुती: ५२ सदस्य) - शिवसेना (उबाठा): ०५ सदस्य
- काँग्रेस: ०२ सदस्य
पेण तालुक्याला मिळणार मान?
अध्यक्षपद भाजपकडे आल्याने आता पेण तालुक्यातील भाजपच्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पेण तालुक्याला जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता असून, भाजप कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकणार, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील राजकीय अनिश्चितता संपल्याने आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रखडलेली विकासकामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
