पेण | विनायक पाटील
माजी राज्यमंत्री स्व. मोहनराव महादेव पाटील यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त वाकरुळ (ता. पेण) येथील ‘स्नेहसागर’ निवासस्थानी ‘स्मरण सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्यात मान्यवरांनी स्व. पाटलांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
भक्तीमय वातावरणात कार्यक्रम
स्मरण सोहळ्यानिमित्त सकाळी ९ ते ११ या वेळेत हरिपाठ पारायण आणि हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ओंकार महाराज सूर्यवंशी (कोल्हापूर) यांनी आपल्या ओघवत्या कीर्तनातून स्व. मोहनराव पाटील यांच्या लोकहितवादी कार्याचा गौरव केला. स्व. पाटलांनी समाजसेवेचा जो वसा घेतला होता, त्यामुळेच बारा वर्षांनंतरही त्यांच्या स्मृतिदिनी इतक्या मोठ्या संख्येने जनसागर उपस्थित राहतो, हे त्यांच्या निस्वार्थी कार्याचे फलित असल्याचे महाराज म्हणाले. एका तपापर्यंत आपल्या वडिलांचा स्मृतिदिन इतक्या श्रद्धेने साजरा करणारे खासदार कदाचित पहिलेच असावेत, अशा शब्दांत त्यांनी स्व. पाटलांच्या स्मृतींना उजाळा दिला.
जीवन मूल्यांवर मार्गदर्शन
यावेळी ओंकार महाराजांनी उपस्थितांना आत्मपरीक्षणाचे आवाहन केले. मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान मांडताना त्यांनी भक्ती आणि परमार्थ यासाठी वेळ काढण्याचे आवाहन केले. तसेच प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, असा संदेशही त्यांनी दिला.
मोठ्या संख्येने उपस्थिती
या स्मरण सोहळ्यास संत सेवा मंडळ (पेण तालुका), श्री संत ज्ञानेश्वर मंदिर (वाकरुळ), संत सेवा मंडळ (पेण पूर्व विभाग), लांबे महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्यासह पेण, सुधागड, रोहा आणि खालापूर परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, वारकरी संप्रदायातील मान्यवर, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाटील परिवार व स्नेही यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात उपस्थितांनी स्व. मोहनराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
