• Fri. Jul 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चौल भगवती येथे मटका जुगारावर रेवदंडा पोलिसांचा छापा; २९,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

ByEditor

Jul 24, 2026

रेवदंडा | सचिन मयेकर
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौल भगवती (ता. अलिबाग) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगारावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २९,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाईलच्या माध्यमातून सुरू होता जुगार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ८.४० च्या सुमारास चौल भगवती येथील ४७ वर्षीय इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मटका जुगार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हा आरोपी लोकांकडून पैसे स्वीकारून मोबाईलवरील व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आकडेमोड नोंदवत होता. या माहितीची खात्री करून पोलिसांनी छापा टाकला.

मुद्देमाल जप्त; गुन्हा दाखल

या कारवाईत पोलिसांनी ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन (एअरटेल सिमसह) आणि ४,७०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण २९,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल केदारनाथ नामदेव सांगरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेवदंडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम, १८८७ चे कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा (कॉ. गु. रजि. क्र. १०५/२०२६) दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद रात्री ११.२९ वाजता करण्यात आली.

सध्या या प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून, सपोनि सुजीत गडदे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पुढील तपास पोलीस नाईक पाटील (पोना/२२२७) हे करीत आहेत. रेवदंडा पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर मटका जुगार चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!