उरण | घन:श्याम कडू
राज्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता उरणमध्येही तीव्र झाली असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या सरकारच्या धोरणांविरोधात आज उरणमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात आला. विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपल्या मागण्यांसाठी एल्गार पुकारला.
शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावर रोष
शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी आणि सरकारच्या कथित निष्क्रियतेचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून, सरकार केवळ आश्वासनांची मलमपट्टी करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या धोरणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे आंदोलकांनी यावेळी नमूद केले.

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत, आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरही टीकास्त्र सोडले. तसेच, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी आग्रही भूमिकाही मांडण्यात आली.
आंदोलनाचा एल्गार
“विद्यार्थ्यांचे भविष्य कोणत्याही सरकारपेक्षा मोठे आहे”, “शिक्षण वाचवा, विद्यार्थी वाचवा” अशा घोषणांनी उरणचा परिसर दणाणून गेला होता. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन राज्यभर अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिक्षण ही देशाची मूलभूत ताकद असून, त्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे ही गंभीर बाब असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले.
अनेक मान्यवरांची उपस्थिती
या आंदोलनात कामगार नेते भूषण घरत, सभापती महेश म्हात्रे, माजी सभापती नरेश घरत, शेकापचे चिटणीस रवी घरत, हेमलता पाटील, संजय ठाकूर, माजी उपसभापती वैशाली पाटील, नगरसेविका नाहिदा ठाकूर, माजी नगरसेविका अफशा मुकरी, माजी नगरसेवक बबन कांबळे, कृष्णा पाटील, धीरज घरत, पंचायत समिती सदस्या निर्मला घरत आणि ज्येष्ठ नेते काशिनाथ गायकवाड यांच्यासह नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वपोनि शेलकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
