संदेश घोलप
श्रीवर्धन : तालुक्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. बोर्ली पंचतन जवळील वेळास गावात सोमवारी रात्री झालेल्या तुफान पावसामुळे देवेंद्र तोडणकर यांचा जुना वाडा कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाड्याचे आणि तेथील काजू प्रक्रिया उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या दुर्घटनेत वाड्याचे छप्पर, पत्रे आणि लाकडी सांगाडा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. याच ठिकाणी असलेल्या रश्मी रत्नाकर तोडणकर (घर क्र. ३५७) यांच्या काजू प्रक्रिया गृहात पाणी शिरल्याने दोन महागड्या काजू प्रोसेसिंग मशीन्सचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शासकीय पंचनाम्याची मागणी
नुकसानभरपाई मिळावी यासाठी पीडित कुटुंबाने वेळास ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाकडे तातडीने लेखी अर्ज दिला आहे. घटनेची त्वरित पाहणी करून पंचनामा करावा आणि शासनाने योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
“घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची पाहणी करण्यात येईल. पंचनामा पूर्ण करून अहवाल तहसीलदारांकडे सादर केला जाईल. शासन नियमांनुसार लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.”
— तलाठी, वेळास परिसर
दरम्यान, तालुक्यात वादळी वाऱ्याचा जोर कायम असल्याने प्रशासनाने किनारपट्टीवरील व ग्रामीण भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
