• Thu. Jul 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मरणानंतरही मरणयातना कायम! चक्रीवादळग्रस्त श्रीवर्धनमधील स्मशानभूमींची दुरवस्था; ग्रामस्थांचा संताप

ByEditor

Jul 23, 2026

श्रीवर्धन । अनिकेत मोहित
“मरणानंतर तरी माणसाच्या यातना संपतात,” असा समज आहे. मात्र, श्रीवर्धन तालुक्यातील काही गावांमध्ये परिस्थिती याच्या पूर्णपणे उलट असल्याचे चित्र समोर येत आहे. वादळानंतर कित्येक वर्षे उलटूनही मूलभूत सुविधा न मिळाल्याने मृत्यूनंतरच्या शेवटच्या प्रवासातही मृतदेहाला अन् नातेवाईकांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. एका बाजूला कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा डांगोरा पिटला जात असताना, दुसऱ्या बाजूला मात्र अंत्यसंस्कारासारख्या अतिशय संवेदनशील अन् मूलभूत सुविधेची दैना उडाली आहे. त्यामुळे “हा विकास नक्की कोणासाठी?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.

काही वर्षांपूर्वी आलेल्या भीषण चक्रीवादळाचा मोठा तडाखा श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावांना बसला होता. या वादळात गावांमधील स्मशानभूमींचे शेड उडून गेले, तर काहींची प्रचंड दुरवस्था झाली. मात्र, एवढा कालावधी उलटूनही येथील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. पावसाळ्यात उघड्यावर अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांना ताडपत्री किंवा छत्र्या धरून उभे राहावे लागत आहे. निसर्गाच्या कोपानंतर आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानेही याकडे पाठ फिरवल्याने तीव्र खंत व्यक्त केली जात आहे.

कोट्यवधींच्या कामांचा गाजावाजा, मागण्यांकडे मात्र कानाडोळा

स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा लेखी व तोंडी निवेदने देऊनही प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. गावात रस्ते, सुशोभीकरण आणि इतर सोहळ्यांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला जातो; मात्र स्मशानभूमीच्या छताच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

“नेतेमंडळींकडे फक्त निवडणुकीपुरता वेळ असतो. आमच्या रोजच्या आणि मरणानंतरच्या प्रश्नांशी त्यांना काहीही घेणे-देणे नाही. राजकीय चिखलफेक बाजूला ठेवून सत्ताधारी असो वा विरोधक, त्यांनी आमची ही गंभीर समस्या आधी सोडवावी.” अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या जनतेला हक्काच्या सुविधांसाठी अजून किती उंबरे झिजवावे लागणार, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने या बाबीची तातडीने दखल घेऊन युद्धपातळीवर स्मशानभूमींची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!