सभापतीपदी भाग्यता पाटील तर उपसभापतीपदी प्रिया भगत यांची बिनविरोध निवड; शेकापच्या ‘एकहाती’ सत्तेचा अंत
अलिबाग : विशेष प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याचे राजकीय केंद्र असलेल्या अलिबागमध्ये आज एका ऐतिहासिक पर्वाचा अंत झाला. तब्बल ४६ वर्षांपासून अलिबाग पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची ‘लाल राजवट’ अखेर कोसळली आहे. बुधवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या भाग्यता नंदन पाटील यांची सभापतीपदी, तर प्रिया भगत यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. या विजयामुळे अलिबाग पंचायत समितीवर आता भगवा दिमाखात फडकला आहे.
दशकानुदशके अभेद्य असलेला शेकापचा बालेकिल्ला का ढासळला, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. चुकीची रणनीती, वास्तवापासून दूर गेलेले आत्ममग्न नेतृत्व शेकापच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. हवेतले राजकारण करणाऱ्या नेतृत्वाला मतदारांनी जमिनीवर आणत मोठा राजकीय धडा शिकवल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
अलिबाग पंचायत समितीच्या एकूण १४ जागांपैकी शिवसेनेने १२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. दुसरीकडे, एकेकाळी अलिबागवर हुकूमत गाजवणाऱ्या शेकापला आणि भाजपला अवघ्या १-१ जागेवर समाधान मानावे लागले. निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेकडून दोनच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली.
४६ वर्षांची सत्ता एका फटक्यात गमावणे, हा शेकापच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. मतदारांमधून मिळणारे असंतोषाचे संकेत ओळखण्यात शेकापचे नेतृत्व अपयशी ठरल्यानेच आज त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली आहे. बालेकिल्लाच उखडला गेल्याने आता पक्षाला मोठ्या आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
नूतन पंचायत समितीमध्ये जयंत वार्डे, संतोष निगडे, प्रकाश पाटील, शरद गोंधळी, शैलेंद्र पाटील, कृष्णा लोभी, भाग्यता पाटील, अंकिता घरत, प्रियांका गुंजाळ, वैशाली करवटे, प्रिया भगत, स्नेहा रूत (शिवसेना), प्रियदर्शनी पाटील (भाजप) आणि अंजली पाटील (शेकाप) यांचा समावेश आहे.
निवडीनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी, मानसी दळवी, दिलीप भोईर आणि अनंत गोंधळी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत अलिबाग शहर दणाणून सोडले.
