रायगड: ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे इस्टिमेट तयार करून देण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या एका सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. योगेश ताकाजी देसाई (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव असून, ते महावितरणच्या चौक सेक्शन-२ कार्यालयात कार्यरत आहेत. ही कारवाई मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी खालापूर येथे करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा पाली बुद्रुक येथे एक व्यावसायिक गाळा असून त्या ठिकाणी २०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी त्यांनी महावितरणकडे अर्ज केला होता. या कामासाठी आवश्यक असलेले इस्टिमेट तयार करून देण्यासाठी अभियंता योगेश देसाई यांनी सुरुवातीला १ लाख ७० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराने रक्कम जास्त असल्याचे सांगितल्यानंतर तडजोडीअंती १ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले.
लाचेच्या या मागणीबाबत तक्रारदाराने ५ मार्च २०२६ रोजी रायगड-अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. एसीबीने ९ मार्च रोजी या तक्रारीची पडताळणी केली असता, देसाई यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १० मार्च रोजी खालापूर येथील महावितरण कार्यालयात एसीबीने सापळा रचला आणि ठरलेली दीड लाखांची रक्कम स्वीकारताना योगेश देसाई यांना रंगेहात अटक केली.
ही यशस्वी कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड एसीबीचे पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले व त्यांच्या पथकाने केली. कोणत्याही लोकसेवकाने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ ‘१०६४’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.
