अतिक्रमण विरोधी मोहिमेत दुटप्पी भूमिका? स्थानिकांकडून संताप व्यक्त
उरण : अनंत नारंगीकर
उरणमधील द्रोणागिरी नोड परिसरात सिडकोच्या जमिनीवर आणि मुख्य रस्त्यांच्या कडेला फोफावलेल्या अतिक्रमणांवर अखेर सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई केली. या मोहिमेत अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असली, तरी काही विशिष्ट टपऱ्या आणि बांधकामे सोयीस्कररीत्या वाचवल्याने सिडकोच्या भूमिकेवर नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
वाहतुकीला अडथळा ठरणारी बांधकामे लक्ष्य
द्रोणागिरी नोड परिसरात गेल्या काही काळापासून अनधिकृत बांधकामांनी उच्छाद मांडला होता. रस्ते दुभाजक (डिवायडर) आणि पदपथांवर (फुटपाथ) पक्की व कच्ची बांधकामे उभी राहिल्याने रस्ते अरुंद होऊन वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. या वाढत्या तक्रारींची दखल घेत सिडकोचे अतिक्रमण विरोधी पथक अधिकारी अमित रजपुत यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सिडकोचे विशेष सुरक्षा पथक आणि स्थानिक पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता.
कारवाई नेमकी कुणासाठी? नागरिकांचा सवाल
सिडकोने एका बाजूला काही गरिबांची कच्ची बांधकामे पाडली असतानाच, दुसरीकडे रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक मोठ्या अनधिकृत टपऱ्या, कॅन्टीन आणि झोपड्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. पथकाने या विशिष्ट बांधकानांकडे दुर्लक्ष केल्याने ‘ही कारवाई नेमकी कोणाला वाचवण्यासाठी?’ असा संतप्त सवाल स्थानिक रहिवासी उपस्थित करत आहेत. सर्वसामान्यांच्या अतिक्रमणांवर हातोडा चालवणाऱ्या प्रशासनाने ‘बड्या’ हितसंबंधांच्या टपऱ्यांकडे डोळेझाक केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
सिडकोने ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता, संपूर्ण परिसरातील सर्वच अनधिकृत बांधकामे विनाभेदभाव हटवावीत, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, अशा ‘निवडक’ कारवाईमुळे सिडको प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कायम राहील, अशी भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणावर सिडकोचे अधिकारी अमित रजपुत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
