दोन्ही पदांच्या निवडी बिनविरोध; दासगाव आणि नाते गणाला मिळाला मान
महाड । मिलिंद माने
महाड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया बुधवारी अत्यंत उत्साहात पार पडली. यामध्ये शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सौ. प्रेरणा जितेंद्र सावंत यांची सभापतीपदी, तर सुरेश शांताराम महाडिक यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे स्पष्ट बहुमत असल्याने ही निवड प्रक्रिया केवळ औपचारिकता ठरली.

प्रशासकीय अनुभव आणि राजकीय वारसा
सभापतीपदी विराजमान झालेल्या प्रेरणा सावंत यांनी यापूर्वी दाभोळ ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून यशस्वी कार्यकाळ भूषवला आहे. त्यांच्या या प्रशासकीय अनुभवाचा उपयोग आता तालुक्याच्या विकासासाठी होणार आहे. त्या दासगाव पंचायत समिती गणातून निवडून आल्या आहेत. दुसरीकडे, उपसभापती सुरेश महाडिक यांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख म्हणून प्रदीर्घ काळ काम केले असून, दांडगा जनसंपर्क असलेला चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. ते नाते पंचायत समिती गणातून प्रतिनिधीत्व करत आहेत.
पंचायत समितीच्या ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाडचे उपविभागीय दंडाधिकारी पोपट उमासे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना तहसीलदार महेश शितोळे आणि गटविकास अधिकारी साळुंखे यांनी सहकार्य केले.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख रवींद्र उर्फ बंधू तरडे, माजी नगरसेवक नितीन पावले, युवासेना तालुकाप्रमुख रोहिदास (पप्या) अंबावले, महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रतिभा पवार यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य अनिल जाधव, संदीप खिडबडे, नूतन गोपाळ मोरे, दिव्या मनोहर रेशीम, रेणुका राजेश देशमुख, शकुंतला श्रीरंग माने आणि सबिहा पाचकर उपस्थित होते.
निवड जाहीर होताच पंचायत समितीच्या आवारात उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींनी आपल्या निवडीचे श्रेय पक्षश्रेष्ठी आणि शिवसैनिकांना दिले असून, तालुक्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
