लगातार तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात राष्ट्रवादीला यश; तटकरे यांच्या नेतृत्वावर मोहोर
म्हसळा : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार म्हसळा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन श्रीपत मनवे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, तांत्रिक कारणास्तव सभापती पद रिक्त राहिल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रभारी सभापती पदाचा कार्यभारही मनवे यांच्याकडेच सोपविण्यात आला आहे.
आरक्षणामुळे सभापती पद रिक्त
म्हसळा पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव होते. मात्र, विहित नियमानुसार या प्रवर्गाचे आरक्षण न पडल्यामुळे सभापती पद सध्या रिक्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळे केवळ उपसभापती पदाची निवड करण्यात आली असून, पुढील प्रक्रियेपर्यंत बबन मनवे हेच प्रभारी सभापती म्हणून कामकाज पाहणार आहेत. या विजयामुळे म्हसळा पंचायत समितीवर सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली आहे.
या निवड प्रसंगी पंचायत समितीचे गटनेते लहू अंबाजी म्हात्रे, सदस्या समृद्धी चाचले, प्रियांका निंबरे, तालुकाध्यक्ष समीर बनकर, रेश्मा कानसे, महिला अध्यक्षा मीना टिंगरे, माजी अध्यक्षा सोनल घोले, श्रीपत मनवे, माजी उपसभापती मधुकर गायकर, माजी सभापती छाया म्हात्रे, महेश घोले, संतोष (नाना) सावंत, किरण पालांडे, अनिल टिंगरे, माजी उपसभापती संदीप चाचले, प्रकाश म्हात्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विश्वास सार्थकी लावणार : बबन मनवे
निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित प्रभारी सभापती बबन मनवे म्हणाले की, “खासदार सुनील तटकरे, ना. आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी मला यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली होती. आता पुन्हा एकदा माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो मी निश्चितपणे सार्थकी लावेन. सर्वांना विश्वासात घेऊन पंचायत समितीचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालवू आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.”
या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
