गटनेतेपदी किसन मोरे यांची नियुक्ती; कोलाड विभागाला प्राधान्य देत राकेश शिंदेंच्या नेतृत्वाचा वरचष्मा
धाटाव । शशिकांत मोरे
दि. ११ मार्च खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या रोहा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. बुधवारी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत सभापतीपदी दिवंगत लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांच्या स्नुषा विजया विनोद पाशिलकर यांची, तर उपसभापतीपदी कोलाड विभागातील तरुण चेहरा संजय मांडलुस्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीतून पक्षश्रेष्ठींनी पाशिलकर कुटुंबाला दिलेला शब्द पाळला असून कोलाड विभागालाही न्याय्य वाटा दिला आहे.
पक्षश्रेष्ठींचा शब्द आणि पाशिलकर कुटुंबाचा सन्मान
सभापतीपदी विजया पाशिलकर यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित होते. लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांच्या निधनानंतर ही निवड त्यांना समर्पित असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. ‘ना’ आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातील महत्त्वाच्या धाटाव गणाला या निवडीमुळे सभापतीपदाचा मान मिळाला आहे.
कोलाड विभागाला प्राधान्य; राकेश शिंदेंची सरशी
उपसभापती निवडीत कोलाड विभागाचे वर्चस्व दिसून आले. या विभागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तिन्ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी तटकरे यांचे विश्वासू युवा नेतृत्व राकेश शिंदे यांच्यावर होती. ही मोहीम फत्ते केल्याचे फळ म्हणून शिंदे यांचे खंदे समर्थक संजय मांडलुस्कर यांची उपसभापतीपदी वर्णी लागली आहे. यामुळे तालुक्यातील राजकारणात राकेश शिंदे यांच्या नेतृत्वाचा वरचष्मा अधोरेखित झाला आहे.
निवडणूक प्रक्रिया व जल्लोष
प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. निवडीनंतर कै. द. ग. तटकरे सभागृहात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा राज्यारोहण व अभिनंदन सोहळा पार पडला.
यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, नंदकुमार म्हात्रे, मनीषा पाटील, युवा नेते राकेश शिंदे, महिला अध्यक्षा प्रीतम पाटील, नीता हजारे, राजेंद्र जैन, राजेंद्र पोकळे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.
“हा सन्मान मी दिवंगत लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांना समर्पित करते. खासदार सुनील तटकरे, ना. आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन.”
— विजया पाशिलकर, नवनर्वाचित सभापती
“पक्षश्रेष्ठींनी तरुण कार्यकर्त्याला दिलेली ही मोठी संधी आहे. युवा संघटनेला अधिक बळ देऊन दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडेन.”
— संजय मांडलुस्कर, नवनर्वाचित उपसभापती
